सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : 42 वर्षांमध्ये पुन्हा एकदा उजनी 100% भरलेले नसल्याची ही नववी वेळ यावर्षी शेतकऱ्यांना पाहायला मिळाली आहे. दरम्यान अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांना भासण्याची चिन्हे आहेत.
अशा परिस्थितीमध्ये उजनीचे पाणी आगामी पावसाळ्यापर्यंत आरक्षित ठेवण्याची मागणी उजनीच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. यावर्षी पाऊस कमी झाला आणि उजनी धरणात 60 टक्के पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
या उजनी धरणावरती सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांच्या व शहराची पाणीपुरवठा योजना तसेच इंदापूर तालुक्यातील उजनीकाठच्या अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत.
याखेरीज पुणे जिल्ह्यातील बारामती दौंड आणि इंदापूर तालुक्यासह नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड व सोलापूर जिल्ह्यातील इतर सर्वच तालुके अवलंबून आहेत. अशा परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची मागणी या कालवा समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली.
उजनी धरण कालवा सल्लागार समितीच्या ऑनलाईन बैठक सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी सूचित केले की, सध्या उजनी धरणामध्ये 54.35 टक्के म्हणजे 92.80 टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध आहे. उजनी धरणाच्या 42 वर्षातील इतिहासामध्ये धरण हे 100 टक्के न भरण्याची ही नववी वेळ आहे.
त्यामुळे धरणातील पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून, काटकसरीने व जपून पाणी वापरावे. उजनी धरण बॅकवॉटरवरती पिण्याच्या पिण्याच्या अनेक नळ पाणी पुरवठा योजनांबरोबर, आगामी काळात उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होणे गरजेचे आहे, त्यासाठी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात पाणी आरक्षित ठेवण्यात यावे.
या मागणीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना पाणी आरक्षित ठेवणे संदर्भात सकारात्मक सूचना दिल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान या बैठकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी आगामी काळात उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील विद्युत पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, अशी मागणी केली. या मागणीवरही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या बैठकीस आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.











