दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज वाई शहरातून हजारोच्या संख्येने मशाल मोर्चा शांततेत काढण्यात आला. दिवसेंदिवस मराठा आंदोलनाची धार तीव्र होताना दिसत असून वाई तालुक्यातील सकल मराठा समाज या विशाल मशाल मोर्चात सहभागी झाला होता.
वाई तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सकल मराठा समाज एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित आल्याचे दिसून आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली येथे आमरण उपोषणास सुरुवात केली. त्याला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध प्रकारे मोर्चा, साखळी उपोषणे सुरू आहेत.
वाई तालुक्यातही साखळी उपोषण सुरू असून विविध पद्धतीने आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोंचविण्याचे काम केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून वाई तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज शहरातून मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी वाई तालुक्यातील सर्व गावांमधून हजारोंच्या संख्येने तरुण, तरुणी, महिला, पुरुष, विद्यार्थी विद्यार्थिनीस जेष्ठ नागरीक वाईमध्ये महागणपती मंदिर येथे एकत्रित झाले होते.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महागणपती मंदिर येथे महागणपतीची आरती करून वाईतून मोर्चास सुरुवात झाली. महागणपती मंदिर, गंगापुरी, वाई नगरपरिषद, जैन मंदिर, रविवार पेठ, चावडी चौक, वाई हायस्कूल, किसनवीर चौक, कृष्णा नदीवरील नवीन मोठा पूल, पोस्ट ऑफिस मार्गे मोर्चा साखळी उपोषणाच्या ठिकाणी पोचला.या वेळी वाईचे उप विभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचीम, वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.











