विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात देखील दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले.
त्यामुळे पवार कुटुंबाची दिवाळी एकत्र होणार की नाही असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता. त्या प्रश्नाचे उत्तर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती दौऱ्यावर असताना दिले आहे.
गोविंदबाग या ठिकाणी राज्यातून अनेक कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. या दिवाळीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार का? या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, एक तर गोविंदबाग हे फक्त पवारसाहेब आणि माझ्या आईचं घर नाही. हे महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेच्या अधिकाराचं, हक्काचं घर आहे. त्यामुळे ३६५ दिवस गोविंदबाग हे महाराष्ट्रच नाही, तर भारताच्या मायबाप जनतेसाठी उघडेच आहे. त्याच्यामुळे तुम्ही कधीही येऊ शकता. त्याच्यावर जेवढा माझा हक्क आहे. त्याच्यापेक्षा तुमचा जास्तच हक्क आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही नेते म्हणून सगळ्या गोष्टी नाही करत. कौटुंबिक नाती काही असतात. पवारांची दिवाळी कालही एकत्र होती.आजही आहे. उद्याही राहील. राजकीय मतभेद जरूर आमचे झाले आहेत. राजकीय विचार वेगळे असतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. त्याच्यामुळे कुटुंबातील नाती, जबाबदाऱ्या या कुठल्याच कुटुंबाने म्हणजे डावलू नयेत. या मताची मी आहे. कारण आपण भारतीय सुसंस्कृत लोक आहोत. जेव्हा राजकीय लढाई असेल तेव्हा पूर्ण ताकदीने लढली जाईल. जेव्हा कुटुंबाच्या जवाबदाऱ्या असतील तेव्हा पूर्ण जबाबदारीने पार पाडू.असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.











