सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
गेल्या 28 वर्षात उजनी मध्ये मत्स्यबीज सोडले गेले नाही. त्यामुळे आता उजनी मध्ये देशी मासे उरलेच नाहीत असे मच्छीमार सांगतात. मच्छिमारांच्या या अडचणींसंदर्भात महान्यूज ने दोन दिवस मच्छीमारांच्या भेटी घेऊन त्यांची माहिती व्हिडिओच्या द्वारे प्रकाशित केली. त्याचा तातडीचा परिणाम लगेचच कालच दिसून आला.
पुणे येथे नीरा डावा व खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे उजनी जलशयामध्ये मत्स्यबीज सोडण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
यावर पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडण्यासाठी निधी 8 दिवसांत उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वस्त केले. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.
उजनी जलाशय हा जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असल्याने सदर विभागाची मागणी मत्स्य विभागाकडे निधी उपलब्ध करून देण्याबाबत होत असते. परंतु मत्स्य विभाकडे निधी नसल्याने उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडणे याबाबत काहीच मार्ग निघत नाही. त्यामुळे उजनी जलाशयातील माशांची संख्या दिवसेंदिवस कमी झाल्याने मच्छीमारांच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी मच्छीमारांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली होती. आज महान्यूज मध्ये यासंदर्भात मच्छीमारांच्या अडचणी व उजनीची समस्या समोर येताच तातडीने दखल घेऊन आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत निधी उपलब्ध करून देणेबाबत आग्रही मागणी केली.











