दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथील किसन वीर- खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन गुरूवारी (दि. १९) आमदार व किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील व त्यांच्या पत्नी अर्चना पाटील या उभयतांच्या शुभहस्ते होणार आहे.
ही माहिती किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले की, मागील गळीत हंगामातील एफआरपी व सर्व देणी दिलेली आहेत. कारखान्यातील अंतर्गत मशिनरींची कामेही पुर्ण झालेली असून, आवश्यक तोडणी वाहतुक यंत्रणेचे करारही पूर्ण झालेले आहेत.
तोडणी वाहतूक यंत्रणेचे अॅडव्हान्सचे वाटप देखील करण्यात आले असून, कारखाना गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने करण्यास सुसज्ज आहे. कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बिगर सभासदांनी आपला परिपक्व झालेला संपूर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास गाळपासाठी देण्यात यावा आवाहन करण्यात आले आहे.
या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभास खंडाळा तालुक्यासह कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद, कंत्राटदार, वाहनमालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहन खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, किसन वीरचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, अनंत तांबे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.











