दौंड : महान्यूज लाईव्ह
कर्ज व विज बिल न भरण्याचा, पूर्ण विज बिल माफ करावे, शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा करावा यासह गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्याचा ठराव पडवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत बहुमताने ग्रामस्थांनी मंजूर केला.
सध्या दौंड तालुक्यात स्वयंघोषित गोरक्षकांनी शेतकऱ्यांची पाळीव जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडवून वाहनचालकांना दमदाटी व गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आर्थिक लुट करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी बोरीपार्धी, दापोडी परिसरातील नंदीवाला समाजातील कुटुंबाला पाळीव जनावरे कत्तलखान्यात चालवल्याचा आरोप करीत मारहाण करीत पैशाची मागणी केल्याप्रकरणी आठ स्वयंघोषित गोरक्षकांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या स्वयंघोषित गोरक्षकांच्या टोळींवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीराव नांदखिले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी केली आहे. दरम्यान दौंड तालुक्यातील पडवी ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत शेतकरी व ग्रामस्थांनी गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला आहे.
सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, त्यामुळे जोपर्यंत शेतीमालाला रस्ता भाव मिळून कर्ज फेड करण्याची ऐपत येत नाही, तोपर्यंत कर्ज फेड न करण्याचा व विज बिल न भरण्याचा निर्णय पडवी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला आहे. कांदा निर्यातीवर ४०% लावलेले शुल्क रद्द करून कांदा निर्यातीसाठी खुला करावा, संपूर्ण कर्जमाफी करावी,
कर्ज पुरवठा करावा, टॅंकर आणि छावणी याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्र व्यवहार करण्याचे व खाटी गाय, वासरे शेतकऱ्यांसाठी जाचक असलेले गोवंश हत्या कायदा रद्द करावा अशी मागणी या करण्यात आली. यावर चर्चा करीत ग्रामसभेमध्ये बहुमताने हे ठराव मंजूर करण्यात आले. तसेच सरकारने शेतीमालाचे भाव कमी ठेवले, त्यासाठी निर्यातबंदी, राज्य बंदी, अनावश्यक आयात या सारखी उपाययोजना करून शेती धंदा जाणीवपूर्वक तोट्यात ठेवला. यामुळे लाखो शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनातून शेतकऱ्यांची कर्जफेड करण्याची व विज बिल भरण्याची ऐपत येत नाही, तोपर्यंत पडवी येथील ग्रामस्थ कर्जफेड करणार नाही असा निर्णयही या सभेत घेण्यात आला. दौंड तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब होले हे ठरावासाठी सूचक असून या ठरावास मानसिंग शितोळे यांनी अनुमोदन दिले. सरपंच नागेश मोरे, प्रमोद शितोळे, मानसिंग होले, कालिदास शितोळे, संजय शितोळे, गणेश बारवकर, अमोल टिळेकर, प्रकाश बारवकर, रवींद्र शितोळे, तुषार शितोळे, रेखा शितोळे, पूजा माने, नलिनी बारवकर, महेश शितोळे आदी या ग्रामसभेत उपस्थित होते.











