राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुला येथे नंदीवाले समाजातील काही कुटुंब आपली पाळीव जाणारे घेऊन जात असताना स्वयंघोषित गोरक्षकांनी ही वाहने अडवून वाहनचालक व नंदीवाला समाजातील कुटुंबाला मारहाण करीत पैशाची मागणी केल्याची घटना घडली. या प्रकरणी यवत पोलीसांनी वरवंड व मांडवगण फराटा येथील आठ स्वयंघोषित गोरक्षकांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
विशाल अनिल दामोदरे, रोहित रमेश रणधीर, संतोष शिवरकर,स्वप्निल पासलकर, प्रेम पाटोळे, किरण सावंत (सर्व रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे ) व मिनीनाथ गव्हाणे, अमोल चौघुले, (दोघे रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) अशी या गुन्हा दाखल झालेल्या स्वघोषित गोरक्षकांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केडगाव दापोडी परिसरातील नंदीवाला समाजातील राहुल चिमाजी गायकवाड (वय ३५) हे पारंपरिक नंदीबैल घेवून मुंबई तुर्भे, दहिसर अंधेरी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गुरुवारी (दि. १२) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बाजीराव सिताराम कोरडे यांच्या मालकीचे ट्रकमधून ८ गाई, ४ बैल तसेच यवत येथील पप्पु नवले यांच्या ट्रकमध्ये राहुल पवार व इतर नातेवाईक व त्यांच्यासोबत ८ देशी गाई,५ गीर गाई, २ कालवड असे दोन्ही ट्रकमध्ये घेऊन जात होते.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बोरीपार्धी हद्दीतील चौफुला येथे ८ ते १० इसमांनी शिवीगाळ करत आम्ही गोरक्षक असून ट्रकमधील असणारे बैल व गाई तुम्ही कत्तल करण्यासाठी कोठे घेवुन चालला आहे? अशी विचारणा करीत पैशाची मागणी केली. तुम्ही आम्हाला पैसे द्या, नाहीतर तुम्ही तुमच्याकडील असलेल्या गाई व बैल हे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याबाबत पोलीसांना सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली.
यावेळी त्यांनी आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. आम्ही आमचे पांरपारीक व्यावसायासाठी चाललो असल्याचे सांगितले असता, त्यांना पुन्हा पैशाची मागणी करीत ट्रक चालकास तुला काय कळते काय? तु लय शहाणा झाला आहे का ? असे म्हणत लाथाबुक्यांनी मारहाण केली. याबाबत राहुल चिमाजी गायकवाड यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आठ जणांवर मारहाण करणे व खंडणीचा गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेडगे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. नंदीवाले समाजातील कुटुंबांनी सदर प्रकार हा पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी विशाल अनिल दामोदरे व रोहित रमेश रणधीर, (दोन्ही रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे) अण्णा ताब्यात घेतले. त्याचे इतर सहा साथीदार फरार झाले आहेत.
या फरार झालेल्या स्वघोषित गोरक्षकांचा शोध यवत पोलीस घेत आहेत. दरम्यान दौंड तालुक्यात मागील काही दिवसांपासून स्वयंघोषित गोरक्षकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काष्टी, राशीन तसेच बारामती तालुक्यातील जनावरांच्या बाजारातून खरेदी विक्री करून जात असलेल्या शेतकऱ्यांची पाळीव जनावरे घेऊन वाहतुक करणारी वाहने अडवून त्यांना मारहाण करून पैसे उकळण्याचा काही स्वघोषित गोरक्षकांनी नवा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये काही तथाकथित स्वयंघोषित पत्रकारांचाही समावेश आहे.
यापूर्वी अशा घटना पुणे सोलापूर महामार्ग, शिरूर – चौफुला – सुपा मार्गावर सातत्याने घडल्या आहेत. खंडणी मागणाऱ्या तथाकथित गोरक्षकांना आवर घालण्याची मागणी शेतकरी पोलिसांकडे करीत आहेत. तर संबंधित गोरक्षकांना अटक करावी व आमची पाळीव जनावरे आमच्या ताब्यात द्यावी अशी मागणी नंदीवाला समाजाने केली आहे.











