राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद व कामगारांच्या मालकीचा असलेला एकमेव कारखाना म्हणून ओळखला जाणाऱ्या आणि सध्या कर्नाटक येथील निराणी ग्रुपला भाडेतत्त्वावर चालवायला दिलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालावर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मधुकराव शितोळे यांचा नामोल्लेख व फोटो छापण्यात न आल्याने याच्या निषेधार्थ माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली सभासदांचा कारखान्यावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याची ४१ वी सर्वसाधारण सभा कारखान्याच्या कार्यस्थळावर शुक्रवारी (दि २९) दुपारी एक वाजता कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल व त्यांच्या संचालक मंडळाने हा कारखाना २५ वर्षाच्या भाडेतत्वावर निराणी ग्रुपला चालवायला दिला आहे. त्यामुळे मागील वर्षापासून कारखान्याचे गाळप सुरू झाले आहे.
कारखाना सुरू झाल्याने सभासद व कामगारांमध्ये समाधानकारक वातावरण आहे , तर दुसरीकडे हा कारखाना भाडे तत्वावर चालवायला दिल्याने नाराजी व खंतही अनेक सभासद व कामगार व्यक्त करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर भीमा पाटसची ४१ वी सर्वसाधारण सभा होत आहे. या सर्वसाधारण सभेला मागील तीन सर्वसाधारण सभेत अनुपस्थित राहिलेले भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, माजी आमदार रमेश थोरात हे उपस्थित राहणार का? भीमा पाटस कारखान्याचे खाजगीकरण झाल्याचा आरोप रमेश थोरात यांनी यापुर्वी अनेक वेळा केला आहे. उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेला थोरात हे उपस्थित राहून कारखान्याचे अध्यक्ष कुल आणि त्यांच्या संचालक मंडळाला समोरासमोर जाब विचारतील का ? हे पाहावे लागणार आहे.
मागील काही वर्षांपासून कारखान्याचे अध्यक्ष आमदार कुल आणि त्यांच्या संचालक मंडळाला सातत्याने धारेवर धरणारे व कारखान्यांवर जाऊन आंदोलने करणारे भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे हेच एकमेव शेतकरी कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नामदेव ताकवणे पुन्हा एकटेच कुल आणि त्यांच्या संचालक मंडळाचा सामना करणार का ? याकडे ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्यावर पाचशे कोटींचा भ्रष्टाचाराचा कथित आरोप करुन राज्यात मोठी खळबळ उडवली होती. खासदार राऊत यांनी भीमा पाटस कारखान्यावर येऊन वरवंड येथे जाहीर सभा घेऊन आमदार कुल यांना कडवे आव्हान दिले होते. खासदार संजय राऊत यांच्या सभेला एका स्टेजवर आलेले माजी आमदार रमेश थोरात व माजी संचालक नामदेव ताकवणे पुन्हा एकदा कुल यांच्या विरोधात आणि ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी भीमा पाटस सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी एकत्र येणार का ? हे ही या निमित्ताने पहावे लागणार आहे.
मात्र, कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांच्यासाठी उद्या होणारी ही ४१ वी सर्वसाधारण नवीन नाही, विरोधकांच्या प्रश्नाला कशाप्रकारे सामोरे जायचं ? त्यांना कशाप्रकारे उत्तरे द्यायची? याची रणनीती कुल यांच्याकडे ठरलेली असते. कारखान्याचे अध्यक्ष कुल यांना मानणारा मोठा सभासद व कामगार वर्ग आहे. तसेच कारखान्याचे माजी संचालक भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे व आमदार कुल हे एकाच पक्षात असल्याने कुल यांच्यासाठी या सर्वसाधारण सभेला काळे यांच्याकडून फारसा विरोध होणार नाही, ही आमदार कुल यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे.











