काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला निषेध.. लावला थेट प्रदेशाध्यक्षांना फोन..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : काँग्रेस पक्षाचे पुणे पदवीधर शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी इंदापूर तालुक्यातील अनेक शाळांना प्रिंटरचे वाटप केले, परंतु ते वाटप करत असताना त्यांनी तालुक्यातील स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना भेटण्यास रस दाखवला नाही.व साधा फोनही कुणाला केला नाही.मात्र ते भाजपा कार्यकर्त्यांना भेटून गेल्याचे सांगत इंदापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आमदार आजगावकर यांच्यावर भडकले. इंदापूर तालुक्यात अशी बदमाशगिरी खपवून घेणार नाही, असे स्पष्ट करत आसगावकरांचा निषेध केला. एका कार्यकर्त्याने तर प्रदेशाध्यक्षांना फोन लावत याची तक्रार केली.
आसगावकर यांनी इंदापूर तालुक्यातील अनेक शाळांना प्रिंटरचे वाटप केले, परंतु ते वाटप करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले, याची खंत व्यक्त करत इंदापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुफियान खान जमादार यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दूरध्वनी करत आपली तक्रार व्यक्त केली. यावेळी तक्रार सांगत असतानाच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही कार्यकर्त्यांना सांगितले.
यावेळी इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद साबळे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यात कार्यक्रमासाठी येऊन कॉंग्रेस कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक दुखावण्याचे काम त्यांनी केले असल्याचा साबळे यांनी आरोप करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
तर काँग्रेस पक्षाचे धाडसी कार्यकर्ते महादेव लोंढे यांनी आमदार आसगावकर यांचा निषेध व्यक्त करत खरपूस समाचार घेतला.
इंदापूर तालुक्यातील काँग्रेसच्या कोणत्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रिंटर वाटप केले नाही, असे सांगत आमदार आसगावकर यांची बदमाशगिरी खपवून घेणार नाही.असे सांगत लोंढे यांनी तीव्र शब्दात निषेध केला. आता इंदापूर तालुक्यातील प्रिंटर वाटपाची यादी इंदापूर तालुका काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष व सध्या भाजपात असलेले स्वप्निल सावंत यांनी बनवली असल्याची चर्चा सुरू आहे.
इंदापूर तालुका हा पुर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, काँग्रेसचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. स्वप्नील सावंत यांनीही काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला. सध्याच्या घडीला नगण्य, बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते काँग्रेसमध्ये राहिले आहेत. त्यांची ताकद इतर पक्षांच्या तुलनेत कमी आहे. परंतु ते काँग्रेसचे एकनिष्ठ असल्याने पक्ष नेतृत्वाला यांची गंभीर दखल घ्यावी लागणार आहे.











