घनश्याम केळकर
बारामती : महान्यूज लाईव्ह
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद चुकून सगळ्या महाराष्ट्राच्या पुढे आला. ते अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी नेमलेल्या सुपर वॉरियर्सच्या खासगी कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमासाठी पत्रकारांना बंदी असल्यानेच बावनकुळे अती मोकळेपणाने बोलले. त्याची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्यामध्ये बावनकुळेंच्या बोलण्यावर झालेला हशाही ऐकू येतो आहे. आता बावनकुळेंनी एका बाजूने सावरासावर करण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे ही क्लिप बाहेर गेलीच कशी याची चौकशी सुरु केली आहे.
या ऑडिओ क्लीपमध्ये बावनकुळे यांनी निवडणुकीपर्यंत आपल्या विरोधातील बातमी येणार नाही याची काळजी घ्या, त्यासाठी आपल्या बुथच्या परिसरातील बातमीदारांना महिन्यातून एकदा चहाला न्या. परिसरातील कलाकार पाचसहा पत्रकार असतील त्यांची यादी करा. एक दोन वेब पोर्टलवाले, एक दोन यु ट्युब चॅनेलवाले, आणि एक दोन इलेट्रॉनिक मिडियावाले असे पाच सहा जण असतात. चहाला म्हणजे काय ते समजले ना? म्हणत असतील तर ढाब्यावर न्या, असे म्हणताना दिसत आहे. ते ज्या टोनमध्ये बोलत आहे, त्यानूसार पत्रकारांना कसेही करून मॅनेज करा असे सांगताना ऐकू येते आहे.
काही थोड्याफार वगळल्या तर राज्यातील पत्रकार किंवा मोठ्या मिडिया हाऊसकडून यावर फार काही प्रतिक्रिया ऐकू आली नाही. बहुतेक सगळ्या पत्रकार बांधवांनी कळून न कळल्यासारखे केले. यामागचे इंगित आता सगळ्यांना कळून चुकले आहे. चहाच्या आमंत्रणाची वाट आता बातमीदार बघत नाहीत तर आमच्या चहापाण्याचे बघा असे अगोदरच सांगतात असा बावनकुळेंचा अनुभव असल्याशिवाय त्यांना असे काही बोलण्याचे सूचले असेल का ? खरेतर बावनकुळेंनी मोठ्या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींचे नाव येथे घेतलेले नाही. कदाचित त्यांना वरच्यावर मॅनेज करता येईल असा त्यांना विश्वास असावा. देशातील निवडणुका आता माध्यमांसाठी पैसे कमाविण्याची संधी असते. मोठमोठ्या माध्यमसमुहातील मार्केटींग टीम आता निवडणूकांची पॅकेज बनविण्यात मग्न असेल. बावनकुळेंच्या या बोलण्यामुळे त्यांना आता पॅकेज मिळण्याची खात्री वाटत असेल. निवडणुका जसजशा जवळ येत जातील, तसेतसे माध्यमांच्या टीम निवडणुकांची पॅकेजेस विकण्यासाठी सगळ्या राजकीय पक्षांच्या आमदार, खासदार, मंत्र्यांच्या दालनाबाहेर वाट पाहत असलेल्या दिसतील. त्यामुळे अशा प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील मोठ्या लोकांकडून बावनकुळेंना आता भीती नाही.
त्यांना आता भीती वाटते आहे ती स्थानिक स्तरावरील माध्यमांची. स्थानिक स्तरावर असे ‘ कलाकार ’ असतात, ते मॅनेज होणे अवघड होते. त्यांच्याकडून सोशल मिडियावर पडलेली एखादी पोस्ट किंवा व्हिडिओ राज्यात हलकल्लोळ माजवू शकतो याची त्यांना भीती वाटते आहे. त्यांना मॅनेज करा असे ते आपल्या प्रतिनिधींना सांगताना दिसत आहेत.
यात बावनकुळेंपेक्षा माध्यमांचा दोष जास्त आहे. निवडणूकांच्या काळात मतदारांना योग्य माहिती देऊन योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी मदत करणे हे खरे तर माध्यमांचे काम आहे. पण पैशाच्या हव्यासापोठी माध्यमांनी ही भुमिका केव्हाच सोडून दिली आहे. मोठमोठी वृतपत्रे या काळात निवडणूकांची पॅकेज विकून पैसे कमावतात. टीव्ही चॅनेलही यापेक्षा वेगळे काहीच करत नाहीत. ज्यांच्याकडून ते पैसे घेतात, त्याचे गुणगान ते गात राहतात. त्याच्या विरोधातील मुद्दे दाबून टाकतात हे उघड सत्य आहे. त्यामुळे खासगी बैठकीत बोलायचे ते बावनकुळे थोड्या जास्त लोकांसमोर बोलले यापेक्षा त्यांची मोठी चुक नाही. यामुळेच पत्रकार बांधवांनीही त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलेले नाही. याउलट यापुढील काळात बावनकुळेंच्या चहापानाला उपस्थित पत्रकारांची संख्या वाढण्याचीच शक्यता आहे.