वर्षा गायकवाड : महान्यूज लाईव्ह
हिर्डोशी (ता. भोर) येथे गणेश विसर्जनावेळी आरती करताना अचानक मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला केला. त्यात अनेक जणांना जणांना मधमाशांनी चावा घेतला. यात महिला पुरुष व लहान मुलांचा समावेश होता. या सर्व जणांवर हिर्डोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
हिर्डोशी येथील सोमजाईवस्ती, हरळीचा माळ आणी टाकीचा माळ येथील नागरिक काल सायंकाळी साडेतीन वाजता स्मशानभूमीशेजारी असलेल्या नीरा देवघर धरणाच्या पाण्यात गणपती विसर्जनासाठी पोचले होते. त्या ठिकाणी विसर्जन मिरवणूक पोहोचली. गणपती व गौरी विसर्जनापूर्वी आरती सुरु असताना अचानक मधमाशा आल्या व आरती चालू असतानाच ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला.
यामुळे विसर्जनासाठी आलेली लहान मुले, युवक, महिला, पुरुष असे १५० पेक्षा अधिक उपस्थित होते. त्या प्रत्येकाला मधमाशांनी चावा घेतला. त्यामुळे सर्वजण वाट मिळेल, तिकडे सैरावैरा पळत सुटले.
दरम्यान काही वेळाने मधमाशा शांत झाल्यावर स्थानिक ग्रामस्थ धोंडिबा मालुसरे, बबन मालुसरे, बबन राजीवडे, अरुण मालुसरे, लक्ष्मण धामुनसे, संतोष मालुसरे, अंकुश धामनसे आदी ग्रामस्थांनी टाकीचा माळ, हरळीचा माळ व सोमजाईवस्ती येथील नागरिकांच्या उपस्थितीत गणेश व गौरी विसर्जन केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात मधमाशांनी चावा घेतलेल्या नागरिकांना इंजेक्शन, गोळया, औषधे देऊन उपचार करण्यात आले.











