सुळेंची साथ सोडून इंदापूरच्या नेत्यासह कार्यकर्त्यांनी अजित दादांना साथ दिल्यानंतर सुळेंना आता कोणाची साथ ? कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीस उपस्थित राहणार..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा सोमवारी (ता. २५)इंदापूर तालुक्याचा दौरा होत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) विकास खिलारे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, यांच्यासह तालुक्यातील अनेक दिग्गज मातब्बर नेत्यांनी तसेच गारटकर यांच्या इंदापूर शहरातील सहकाऱ्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची साथ सोडून अजित पवारांना साथ दिली व शरद पवार व सुप्रिया सुळे या एकाकी पडल्याचे चित्र स्पष्ट झाले.
अशा परिस्थितीत पक्षाची भक्कम बांधणी करत पक्षाध्यक्ष शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी तयारी सुरू केली आहे. अशा कठीण परिस्थितीत खा.सुप्रिया सुळे यांच्याबरोबर सतत सावलीप्रमाणे बरोबर असणाऱ्या दिग्गजांनी साथ सोडल्याने सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यात कोणते शिलेदार त्यांना साथ देणार ? याची चर्चा इंदापुरात सुरू झाली आहे.
खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्यात दुपारी २ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत दौऱ्यावर आहेत. दुपारी साडेतीन वाजता सुळे या सोनाई पॅलेसमध्ये कार्यकर्ता संवाद बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शहरातील गणेश मंडळांच्या आरत्या साठी इंदापूर शहरातील गणेश मंडळांना भेटी देणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निष्ठावंत व पवार साहेबांवर प्रेम करणा-या जिवाभावाच्या व गेली दोन महिने साहेबांच्या विचाराची एकनिष्ठेने खिंड लढवणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.