वर्षा गायकवाड : महान्यूज लाईव्ह
भोर : कानून के हाथ लंबे होते है.. हा डायलॉग आता जुना झाला, परंतु अजूनही आधुनिक तंत्राच्या काळातही पोलिसांची तपासाची जुनी पद्धत आहे, ती अजूनही कामी येते, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतील बारकावे टिपून एखाद्या मोठ्या घटनेचा सुतावरून स्वर्ग गाठावा तशा स्वरूपाचा सुगावा देतात. भोर तालुक्यातील राजगड पोलिसांच्या बाबतीतही असंच काहीसं झालंय.
राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंटरनेट केबल ची वायर चोरीला गेली आणि पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत वैभव वाडकर रा. वारवडी व सुमित जगदाळे रा. गराडे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना अटकही केली आणि त्यांच्याकडून सुमारे सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, चोर तर सापडले पण हे चोर सापडण्यासाठीची तपासाची कौशल्याची प्रक्रिया जी होती ती काहीशी गमतीशीर अशीच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस स्टेशन मध्ये इंटरनेट केबल वायर चोरीचा गुन्हा दाखल होता. त्याचा तपास राजगडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. तपासा दरम्यान पोलिसांनी एक गोष्ट हेरली. चोर चोरी करून गेले काही पुरावा सोडला नाही पण एका पाण्याच्या वीस रुपयांच्या बाटलीने त्यांचे बिंग फोडले.
चोरी करतेवेळी आरोपींनी एका हॉटेलमधून पाण्याची बाटली घेतली व त्याचे पैसे पेटीएमने दिले, त्यावरून संशयित आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे केबल वायरचे काम करणारे कामगार आहेत. तेच गुन्हेगार निघाले. गुन्ह्यातील संशयित आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून पकडण्यात आले.
ही कामगिरी. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ, हवालदार कोल्हे, खरात, राऊत यांनी केली.