ज्ञानेश्वर रायते : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील वाढत्या खडी क्रशर मशीनच्या आणि प्रदूषणाच्या विषयावरून वातावरण तापले आहे. चक्क माढा तालुक्यातील काही लोकांना इंदापूर तालुक्याच्या शेतकरी व नागरिकांच्या आरोग्याचा पुळका आल्यामुळे, ते इथे येऊन आंदोलन करत आहेत. मात्र इंदापूर तालुक्यातील नागरिकांना आपल्या बुडाखाली काय जळते हे अजून माहीतच नाही.
दुसरीकडे असंही सांगितलं जातं की, गेल्या आठ नऊ वर्षात खूप विकास झाल्यामुळे, रस्त्याच्या कामामुळे तालुक्यात खडी क्रशर वाढले आहेत! नक्कीच, विकासकामे होतच आहेत, पण फक्त रस्त्याच्या कामाच्या नावाखाली बांधकाम ठेकेदारांचा पर्यावरणाच्या डोक्यावर नंगानाच करण्याचा जो हैदोस सुरू आहे, त्यावर प्रत्यक्षात कोणीच का पावले उचलत नाही?
इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावात गेल्या चार ते पाच दिवसापासून अनेक जेसीबी आणि हायवा डंपर रस्त्याच्या कडेचा मुरूम नेत आहेत. या मुरमाचा नक्की किती कर भरलेला आहे, रॉयल्टी भरलेली आहे त्याची माहिती स्थानिक नागरिकांनाही नाही. कमी रॉयल्टी भरायची आणि अधिक मुरूम न्यायचा हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून इंदापूर तालुक्यात सगळीकडे बिनधास्तपणे सुरू आहे आणि याला अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे शक्यच नाही.
इंदापूर तालुक्यातल्या पिंपळे गावात गेल्या चार ते पाच दिवसापासून गायरानाच्या क्षेत्रातून बेकायदेशीरपणे गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. गावचे सरपंच अनिल बागल यांनी सांगितले की, याची कोणालाच माहिती नव्हती. 84 नंबरच्या गटातून अचानकपणे रात्रीच्या वेळी हा मुरूम नेला जात होता, परंतु आता दिवसाही हे गौण खनिज उचलले जात असून बिनधास्तपणे उत्खनन करणाऱ्या लोकांना महसूल विभागाचा वरदहस्त असल्याशिवाय हे शक्यच नाही. आम्ही याचा पण सिनेमा करून नेमका किती मुरमुचल्ला आणि त्याची किती रॉयल्टी भरली याचा पाठपुरावा करणार आहोत.
दुसरी गोष्ट म्हणजे इंदापूर तालुक्यातील बारामती इंदापूर या रस्त्यावरील संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. येथील सोनाई उद्योग समूहाच्या समोरील अजस्त्र डोंगर फोडण्याचे काम गेले अनेक दिवस सुरू आहे. आता बऱ्यापैकी हा डोंगर फोडलेला आहे, रस्ताही होत आला आहे, पण या डोंगर फोडलेली लाखो ब्रास माती काढलेली आहे. आता अर्थात या मातीचा ठेकेदाराने किती कर भरला? याचीही अद्याप कोणी माहिती घेतलेली नाही. जरी हा रस्त्याच्या कामाचा भाग असला, तरीही या मुरूम, मातीचे काय झाले? माती कोठे ठेवली गेली? याची उत्तर अधिकाऱ्यांना द्यावेच लागेल.
विकासाच्या नावाखाली मुठभर लोकच नंगानाच करत असतील, तर तेही बरे नाही. एक मात्र खरे की, गेल्या आठ नऊ वर्षात जो प्रचंड विकास झाला, त्या विकासात गावोगावचे नवनिर्माण केलेले ठेकेदार नखशिखांत न्हाऊन निघाले आहेत. त्यांच्याबद्दलही लोकांच्या काही तक्रारी नाहीत, मात्र हे सारे तुमच्यासाठीच सुरू आहे असा उपकार दाखवताना कामाचा दर्जा जो बिघडतोय, त्याकडेही एकदा विकासाच्या निर्मात्यांनी लक्ष दिले पाहिजे.
इंदापूर तालुक्यातील एका गावात छोट्या पाटबंधारे विभागाच्या हद्दीतून अनेक झाडे तोडली जात आहेत. तलावाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी आड येणारी ही झाडे तोडली जात आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांनीच ही झाडे आमच्याच सांगण्यावरून तोडली जात असल्याचे स्थानिक नागरिकांना सांगितले, मात्र अनेक वर्षांची ही झाडे तोडताना पर्यावरणाचे संतुलन बिघडते आहे, याचा या अधिकाऱ्यांना विसर पडला असेल.
अशाप्रकारे इंदापूर तालुक्यात तालुक्याला गतिमान विकास देण्यासाठी गावागावात नव्याने तयार झालेल्या ठेकेदाररुपी विकासपुरुषांचा हैदोस सुरू आहे. विकासाच्या नावाखाली धोरणकर्त्यांचा देखील त्याला अप्रत्यक्ष पाठिंबा असावा, कारण त्याशिवाय अधिकाऱ्यांच्या देखील उगीच कानाडोळा केला जात नाही.
अर्थात अधिकारी एकदम सहज कानाडोळा करतात असं नाही, अधिकाऱ्यांचे खिसे गरम केल्याशिवाय हा कानाडोळा शक्यच नाही, परंतु या गावोगावच्या विकासपुरुषांना आता आवरावे, कारण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा संतुलन बिघडतोय आणि आपल्या बुडाखाली काहीतरी भयानक जळतंय त्याची जाणीव गावोगावच्या सजग नागरिकांनाही झाली पाहिजे. केवळ रस्त्याचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास असं नव्हे, तालुक्याच्या पर्यावरणाच्या संतुलनाचाही विचार करायला हवा. ते पर्यावरण कोणी इंद्रायणीच्या नदीत बुडवलेल्या गाथेप्रमाणे, जर पायदळी तुडवत असेल तर अशा नाठाळांच्या माथ्यावर कायद्याची काठी हाणण्याची देखील तयारी ठेवली पाहिजे.