इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राज्यातल्या राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि कोण कोणाबरोबर असा चर्चेचा प्रवाह सुरू राहिला. अशातच पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य नेते मंडळी ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झाली. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. इंदापुरात तर राष्ट्रवादीची सत्ता आहेच, पहिल्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या गटातील सर्वजण अजित पवारांच्या पाठीशी असल्याचे मेळाव्यात दिसले.
त्यानंतर बरेच दिवस वातावरण शांत राहिले आणि अचानक सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यात भेट दिली. कार्यक्रम छोटेखानी, एका शाळेचा, परंतु चर्चा मात्र झाली प्रवीण मानेंची आणि त्यानंतर आता गेल्या आठ दिवसात या चर्चेने चांगलाच आकार घेतला. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी या कार्यक्रमात एक भाषण देखील केले आणि प्रवीण माने यांचे पुन्हा एकदा तालुक्याच्या राजकारणातील कमबॅक त्यांच्या चाहते आणि कार्यकर्त्यांसाठी सुखावणारे ठरले.
इंदापूर तालुक्यात माने कुटुंबाची ताकद मोठी. त्यांच्या उद्योग समूहाचा विस्तार लक्षात घेता त्यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. राजकारणापेक्षा ही व्यवसायात अधिक लक्ष देताना या कुटुंबाने तालुक्यात सर्वाधिक मोठा रोजगार निर्माण केला. हजारो कुटुंबे रोजगारनिर्मितीला जोडली. याबरोबरच राजकारणात उतरल्यानंतरही पुणे जिल्ह्याच्या बांधकाम सभापतीपदी असताना प्रवीण माने यांनी युवकांचे बांधलेले संघटनात्मक जाळे विणले. ही देखील त्यामागची मोठी ठेव आहे. अशा परिस्थितीत विधानसभेच्या निवडणुकीत दिलेला शब्द पाळला. मात्र निवडणुकीनंतर प्रवीण माने यांनी राजकारणापेक्षा उद्योगाकडे जास्त लक्ष दिले.
अर्थात या काळातही त्यांनी आपल्या संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही, राष्ट्रवादीच्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची हजेरी अधूनमधून दिसत राहिली, मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी खासदार सुप्रिया सुळे सोबत दाखवलेली हजेरी आजपर्यंतच्या इतर कोणत्याही कार्यक्रमापेक्षा अधिक उठून दिसली आणि त्याची तालुक्यात अधिक चर्चा झाली.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राज्यभरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती आणि त्यांच्या भोवती वाढणारी सामान्य कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी या पार्श्वभूमीवर प्रवीण माने यांनी या कार्यक्रमात केलेले भाषण अत्यंत महत्त्वाचे ठरले. अर्थात हा कार्यक्रम होऊन गेला आहे, मात्र त्याची चर्चा अधिक सकारात्मक रित्या आता होऊ लागली आहे आणि प्रवीण माने यांच्याविषयी सामान्य लोकांची भावना देखील उठून दिसू लागली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुप्रिया सुळे आल्या, तर त्यांच्याबरोबर कोण? असा जो प्रश्न अनेकांच्या मनात सतावत होता, तो चुटकीसरशी सुटला. अनेक जण सुप्रिया सुळेंसोबत दिसले, त्यात प्रवीण माने अग्रभागी दिसल्याचा दिलासा त्यांच्या चाहत्यांना अधिक सुखावणारा होता.