रामभाऊ जगताप : महान्यूज लाईव्ह
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा बाळासाहेब तावरे यांनी दिल्यानंतर आता माळेगावचे नवे कारभारी कोण? हा उत्सुकतेचा भाग बनला आहे. दरम्यान मध्यंतरी अजित दादांनाही हा प्रश्न विचारण्यात आला होता की, बाळासाहेब तावरे यांचा राजीनामा मागे घ्यावा!
या संदर्भात अजित पवार यांनी ही सूचना केली होती की, आम्ही कुणीही त्यांना राजीनामा देण्यास सांगितले नाही, बाळासाहेब तावरे यांनीही स्पष्टीकरण दिले होते की, माझे वय आणि प्राकृतिक स्थिती लक्षात घेता मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, मात्र यानंतर आता माळेगावचे नवे कारभारी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी मुंबई गाठायला सुरुवात केली आहे.
माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मातब्बर नेते आणि सिद्धेश्वर संकुलाचे प्रमुख केशवराव जगताप यांच्या शेकडो समर्थकांनी आज पहाटेच देवगिरी निवासस्थान गाठले. या ठिकाणी अजितदादांना भेटून ते केशवराव जगताप यांची अध्यक्षपदी वर्णी लागावी अशी विनंती करणार आहेत असे समजते.
बारामती तालुक्यात केशवराव जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सिद्धेश्वर संकुलाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात मोठे काम केले आहे. शैक्षणिक आर्थिक विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. साखर कारखानदारीचा देखील त्यांचा दांडगा अभ्यास आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे उत्तम संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्याचा फायदा आगामी काळात राष्ट्रवादीला होऊ शकतो असे हे समर्थक सांगत आहेत.
केशवराव जगताप यांच्या रूपाने माळेगाव कारखान्याला अभ्यासू आणि संयमी नेतृत्व द्यावे अशी मागणी करण्यासाठी या शेकडो सभासदांनी आज पहाटे देवगिरी बंगल्याकडे प्रयाण केले.