महान्यूज: आजची गझल
आवडो वा नावडो कोणास माझे चालणे।
पावलांचा धर्म हा मंजूर नाही थांबणे
लाख घाला बांध किंवा लाख घाला बंधने
कोणत्या सांगा नदीने सोडलेले वाहणे
मग पुढे वाटेत माझ्या यायचे ते येऊ दे
घोर अंधाऱ्या दिशा वा भेटती तारांगणे
सागराला भेटतांना जन्मही जाईल पण
मान्य नाही थांबण्याच्या कारणांचे लोढणे
दूषणे पाण्यास देतो क्षाळतो पापे जिथे
केवढे आहे दुटप्पी माणसाचे वागणे ,
काय आता आरतीने साधतो आहेस तू
अन दिवे पात्रात माझ्या सांजवेळी सोडणे
गझलकार-जयश्री वाघ, नाशिक
सौजन्य: गझलपुष्प समूह पिंपरी चिंचवड










