महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
भाजपने अभिनेता सुशांत सिंह साठी जेवढी ताकद खर्च करून सीबीआयची चौकशी लावली, तशी चौकशी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी का लावली नाही? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
राज्यातील भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा अचानक झालेला अपघाती मृत्यू आजही राज्यातील मुंडे समर्थकांना कोड्यात टाकणारा ठरला आहे. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आले. भाजपकडे त्याहीवेळी केंद्रातील सत्ता होती, मात्र मग त्यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली नाही. मुंडे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याची सीबीआय चौकशी करावी असे भाजपला वाटले नाही, मात्र सुशांतसिंहसाठी सारी फौज कामाला लावली असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
दरम्यान गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांनाही म्हटले आहे की, फक्त आरोप करीत बसू नका, देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या सारखा ओबीसी नेता संपवला आहे, त्यामुळे आरपारची लढाई करा, तुम्ही बोलाल आणि नंतर शांत बसाल तर त्या बोलण्याला काहीच महत्व राहणार नाही असेही पाटील यांनी म्हटले आहे.











