ज्ञानेश्वर रायते – महान्यूज लाईव्ह
कालपरवा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या स्विकृत संचालकपदी नितीन पोपटराव जगताप यांची निवड झाली. काल त्याची औपचारिक बैठकही झाली.. नितीन जगताप आज एक प्रतिथयश उद्योजक आहेत, मात्र ज्या कारखान्यात त्यांची ही निवड झाली आहे, त्या कारखान्याशी त्यांची एक नाळ जुडलेली आहे, ती त्यांच्या वडीलांपासून.. कारण या कारखान्यात त्यांच्या वडीलांनी टर्नर म्हणून काम केले आहे..
ज्या कारखान्यात त्यांचे वडील कामगार होते, त्या कारखान्याचे संचालक होण्याचा मान मिळविणाऱ्या नितीन जगताप यांची कहाणी सुरू होते, ती माळेगाव येथूनच.. माळेगावच्या शारदाबाई पवार विद्यानिकेतनमधून शिक्षण घेतलेल्या नितीन जगताप यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पुण्यात घेतले आणि मुक्ती कन्स्ट्रक्शन पासून सुरवात केली.
काही दिवसांनंतर स्वतःचा उत्कर्ष हा बांधकाम व्यवसाय सुरू केला. आज राज्यातील ३० ते ३५ साखर कारखान्यांची कामे त्यांच्याकडे असतात. बारामती शहरातही त्यांनी बऱ्याच इमारती उभारल्या. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील एका सभेत बारामतीत १०० – १०० कोटींची कामे बांधकाम व्यवसायिक करीत असल्याचे कौतुकोद्गार काढले होते. त्यावेळी ज्या बांधकाम व्यवसायिकांचे कौतुक केले, त्यामध्ये नितीन जगतापांचेही नाव कौतुकाने घेतले होते.
असे हे नितीन जगताप आपला व्यवसाय भला आणि आपण भले अशा वृत्तीतले. मात्र त्यांना अजितदादांनी माळेगावच्या निवडणूकीत उतरवले. अत्यंत चुरशीच्या या निवडणूकीत नितीन जगतापांचा थोडक्या मतांनी पराभव झाला, मात्र अजितदादांनी त्यांना माळेगाव कारखान्यावर आणायचंच ठरवलं आणि दोन दिवसांपूर्वी ते खरं करून दाखवलं.. नितीन जगताप आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक बनले आहेत.











