बारामती : महान्यूज लाईव्ह
स्थळ बारामतीचं गिरीराज हॉस्पिटलचा पाठीमागचा आवार.. आपल्या परिजनांच्या प्रकृतीची चिंता करत बसलेले अनेकजण! त्यामध्येच आहेत, जळगाव कडेपठारचं खांडेकर कुटुंब! की ज्यांनी त्यांचा ऐन उमेदीतला मुलगा दुसऱ्याच्या चुकीने अकारण गमावलाय.. अन् दुसरा मुलगा या दवाखान्यात जगण्याची लढाई लढतोय.. हे सगळं कशामुळे घडलं? तर चार चाकी चालवताना आपल्या कामाच्या नादात मोबाईलचा वापर करून समोर लक्ष न देण्याच्या वृत्तीमुळे! पण त्यात या बिचाऱ्या शाळकरी पोरांचा काय दोष होता?
बारामतीतील जळगाव कडेपठार येथून जळगाव सुपे येथील इंग्लिश स्कूलमध्ये शाळेत जात असताना तीन शाळकरी मुलांना चार दिवसापूर्वी एका चारचाकी गाडीने उडवले. ही शाळकरी मुलं नेहमीसारखीच चालत शाळेत जात होती. परंतु पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने हा अपघात घडवला
अर्थात चारचाकी चालवणारा एका फायनान्स कंपनीचा मॅनेजर या पदावर बसलेला आणि त्याने गाडीतच मोबाईल चालू केलेला.. मोबाईलच्या नादात समोर काय घडतंय हेही त्याच्या लक्षात आलं नाही आणि निष्कारण निष्पाप मुलं या गाडीने उडवली. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर दाखल केला ही गेला असेल, पण दोन कुटुंबातील दोन मुलं जागीच मृत पावली. एका कुटुंबातील एक मुलगा त्या कुटुंबानं तर गमावलाच, पण दुसराही मुलगा गंभीर जखमी झाल्याने बारामतीतील दवाखान्यात उपचार घेतोय.
त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटून गेलंय. दररोज दिड विताच्या पोटासाठी मोलमजुरी करणारे हे दांपत्य आता या मुलाच्या उपचारावरचा खर्च कसा भागवायचा? याची चिंता करत आणि दुसरीकडे हातात काहीच उरलं नाही या भविष्यातील चिंतेचा विचार करत एकटक बघत राहतंय. कोणातरी दुसऱ्याच्या हलगर्जीपणा आणि चुकीच्या निष्काळजीपणामुळे आपण आपला ऐन उमेदीला मुलगा गमावल्याचे दुःख त्यांना प्रचंड झालं आहे.
माहिती तंत्रज्ञानाने प्रचंड बदल आणले. कदाचित सुबत्ता आणली, पण या माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याची अक्कल मात्र सुशिक्षितांकडेही नाही आणि त्याचेच दुष्परिणाम इतरांना भोगावे लागतात. जळगाव कडेपठार मधील खांडेकर कुटुंब याचाच सामना करतंय.











