घनश्याम केळकर
महान्यूज लाईव्ह विशेष
देशात भाजपाचे राज्य आल्यापासून हिंदु धर्माचा उदो उदो करणाऱ्यांना मोठे बळ मिळालेले आहे. कोणत्याही छोट्या मोठ्या कारणावरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. दुसरेकडे इतर विशेषत: मुस्लिम आणि ख्रिश्चनांबद्दल सोशल मिडिया आणी न्यूज चॅनेलमधून जी भाषा वापरली जाते आहे, तशी आक्षेपार्ह भाषा यापुर्वी कधीही वापरली गेलेली नाही. भाजपाच्या या आक्रमक हिंदुत्वापुढे बहुतेक सगळ्या राजकीय पक्षांनी नमते घेतलेले दिसत होते. या तथाकथित हिंदू धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये आणि त्यामुळे आपल्याला मतांचा फटका बसू नये अशी या कॉंग्रेससह सर्व पक्षांची धारणा झालेली दिसत होती. उदयनिधी स्टॅलिन यांनी मात्र भाजपाच्या या आक्रमकतेला तेवढ्याच आक्रमकतेने उत्तर दिले आहे. त्यांना आता कर्नाटकातून प्रियांक खर्गे आणि मुख्यमंत्री सिद्धारमय्या, महाराष्ट्रातून प्रकाश आंबेडकर यांचीही साथ मिळताना दिसते आहे. गमतीची गोष्ट म्हणजे भाजपा या मुद्द्यावर सुरुवातीला प्रचंड आक्रमक झालेला दिसला असला तरी हळूहळू माघार घेताना दिसतो आहे.
भाजपाच्या अमीत मालवियांनी सर्वप्रथम नेहमीप्रमाणे उदयनिधींच्या बोलण्याचा विपर्यास करून त्यांनी सगळ्या हिंदुंचे जेनोसाईड करावे म्हणजे हत्याकांड करावे असे म्हणल्याचे व्टिट केले. पुढच्या दोनच दिवसात त्यांच्या या आरोपातील हवा निघून गेली. असे विषय भाजपा मोठ्या ताकदीने उचलतो आणि त्याचे भांडवल करून विरोधी पक्षांवर हल्ला करतो असा यापुर्वीचा अनुभव आहे. पण यावेळी मात्र भाजपाची साफ पंचाईत झाली. उदयनिधी हे त्यांचे जे मुख्य आरोपी आहेत, त्यांच्या तामीळनाळूत भाजपाचा मताधार अजिबात नाही, त्यामुळे उदयनिधींवर डायरेक्ट हल्ले करून भाजपाला काहीच फायदा नाही. मग त्यांनी इंडिया आघाडीला लक्ष करण्यास सुरुवात केली. पण त्यातही फारसा दम नव्हता. आता भाजपा सत्तेवर आल्यानंतर प्रथम असे दिसते आहे की ऐवढा थेट हल्ला करूनही भाजप त्याचा राजकीय फायदा उचलू शकत नाही. त्यामुळे यापुढील काळात ‘ सनातन ‘ वरील असे हल्ले वारंवार होत राहतील आणि राजकीय पक्षांचा ‘ हिंदुफोबिया ’ बराचसा कमी होईल अशी शक्यता दिसते आहे.
मुळात उदयनिधी जे बोलले त्यात नवीन काहीच नाही. त्यांचा संपुर्ण पक्ष ज्या विचारधारेवर आधारीत आहे, त्या विचारधारेनुसारच ते बोललेले आहेत. वर्णव्यवस्था, त्यातून आलेली जातीव्यवस्था आणि समाजामध्ये पेरली गेलेली विषमता याच्याविरोधात त्यांचे वक्तव्य होते. हिंदु अथवा सनातन धर्म आणि वर्णव्यवस्था या एकमेकांपासून कधीही वेगळ्या करता येणार नाहीत. वर्णव्यवस्था हा धर्माचा अविभाज्य असा भाग आहे. ही बाब वेळोवेळी धर्मपंडितांनी स्पष्ट केली आहे. जोपर्यंत वर्णव्यवस्था आहे, तोपर्यंत समाजात विषमता राहणार हेदेखील तेवढेच स्पष्ट आहे. त्यामुळे अशी मुळातच विषमतेच्या पायावर उभ्या असलेल्या धर्माचे निर्मुलन केल्याशिवाय पर्याय नाही असा सर्वसाधारणपणे उदयनिधींच्या बोलण्याचा अर्थ होता. डॉ. आंबेडकरांनी याच मुद्द्यावर हिंदू धर्म सोडलेला आहे. आजचे एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाचे जे धोरण आहे, तेदेखील या वर्णव्यवस्थेची प्रतिक्रिया म्हणूनच आलेले आहे.
मात्र हिंदुच्या धार्मिक भावना चेतवणे या एकमेव मार्गाने सत्तेवर राहिलेल्या भाजपाला या विषयात इतक्या खोलवर जाणे परवडणारे नाही. असे झाले तर ज्यांनी आपल्या जातीमुळे अपमान सोसला अशांच्या जखमा पुन्हा ताज्या होण्याची शक्यता आहे. भारतात ९० टक्क्यांहून जास्त लोकांना त्यांच्या जातीवरून आयुष्यात कुठेना कुठे अपमानाचा सामना करावाच लागतो आणी ही जातव्यवस्था ही सनातन किंवा हिंदु धर्माचा अविभाज्य हिस्सा आहे. भाजपाने सनातनचा अपमान जर फारच मनाला लावून घेतला तर त्यातून जे मंथन होईल त्यातून या सनातन धर्मामुळे अपमानित झालेल्या या लोकांच्या आठवणी जर पुन्हा ताज्या होऊ लागल्या तर भाजपाला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल.
उत्तर प्रदेशातील एका साधुने उदयनिधीच्या डोक्याची किंमत १० कोटी रुपये ठरवली, त्याला उदयनिधींनी १० रुपयाच्या कंगव्याचा पर्याय दिला. आता हे साधू म्हणे स्वत: जाऊन उदयनिधींचे डोके कापणार आहेत. ‘ वरुन किर्तन, आतून तमाशा ‘ असेच या साधुमहाराजांच्या वृत्तीचे वर्णन करावे लागेल. जेवढे हे ‘ सनातन अपमान ‘ प्रकरण ताणले जाईल तेवढे अशा तामसी साधुंचे ढोंग उघडे पडणार आहे. त्यामुळे पुढच्या काळात हा विषय मिडियातून लुप्त झालेला दिसेल. त्यामुळे सनातन आणि सत्य धर्माची लढाई पुन्हा एकदा होता होता राहणार आहे.
यात आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे उठल्या बसल्या शाहू फुले आंबेडकरांचा घोष करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रातही या विषयावर भाष्य करण्याची हिंमत दाखवणारा प्रकाश आंबेडकर सोडून एकही विचारवंत आज दिसत नाही.











