सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पुणे- सोलापूर महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणाच्या सर्व्हिस रोडचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरानजीक देशपांडे व्हेजच्या पाठीमागे नव्याने होत असलेल्या या रस्त्याचे सुरू आहे. कोट्यावधी रुपये खर्च होत असलेल्या नॅशनल हायवेचे काम अत्यंत दर्जेदार होण्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करत असताना मात्र या कामात मुरूम म्हणून चक्क चिखल वापरला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही धक्कादायक माहिती इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पोपट शिंदे व त्यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांनी ही बाब उघडकीस आणली आहे.

६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी डंपरने चक्क चिखल टाकण्यात येत असल्याचे पोपट शिंदे व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. या कामासाठी मुरूम टाकण्याचे ऐवजी चिखलयुक्त गाळ माती वापरली जात असल्याचे पोपट शिंदे यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दाखविले.

पोपट शिंदे यांनी चक्क या चिखलात स्वतः जाऊन हा चिखल आपल्या पायाने तुडवून दाखवला. यावरून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पोपट शिंदे यांनी दाखविले. त्यानंतर शिंदे यांनी तात्काळ तहसीलदार श्रीकांत पाटील तसेच हायवेचे प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या रोडवर होत असलेल्या निकृष्ट कामाची भ्रमणध्वनी द्वारे माहिती देत त्यांना त्या चिखलाचे व्हिडिओही पाठवून दिले.











