सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील बावड्यानजिकची ही घटना.. येथील एका विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीस सतत त्रास देणाऱ्या राज नावाच्या विद्यार्थ्यास शाळेतील रक्षाबंधन कार्यक्रमात विद्यार्थीनीने राखी बांधली व आता मी तुझी बहीण आहे, त्यामुळे आता मला त्रास देवू नकोस, अशी आर्त विनंतीही केली, पण त्याला राखी बांधल्याची बाब पटली नाही, कारण त्याने चक्क विद्यालयाच्या आवारातच राखी बांधणा-या शालेय मुलीला मारहाण केली.
सदर विद्यार्थिनीने का मारतोय असे विचारल्यावर तिच्या केसाला धरुन पुन्हा मारहाण केली. विद्यालयात सतत देत असलेला त्रास व राखी बांधल्यानंतर विद्यालयाच्या आवारातच भरदिवसा केलेल्या मारहाणीला कंटाळून अखेर शालेय विद्यार्थीनीने इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.त्यानुसार बावड्यातील एकावर पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राखी बांधल्यानंतर बहिणीचे रक्षण करणे हे भावाचे कर्तव्य असते, मात्र डोक्यात सडक्या विचाराच्या प्रवृत्तीने बहिणीला त्याच दिवशी मारहाणीची ओवाळणी देणा-या सडकसख्याहारीने मात्र नात्याची पुरती वाट लावली.
ही घटना शनिवारी (दि.२)रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बावडा परिसरातील एका विद्यालयाच्या आवारात घडली. या प्रकारामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुली खरंच सुरक्षीत आहेत का? असा सवाल यानिमित्ताने पुढे आला आहे. असे प्रकार घडू नयेत यासाठी मस्तवाल झालेल्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
याबाबत शालेय विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विद्यार्थीनी ही विद्यालयात शिक्षण घेत आहे. याच विद्यालयात शिक्षण घेणारा राज हा त्या विद्यार्थीनीच्या पाठीमागे येवून तिची छेड काढायचा. परंतु त्या मुलीने घाबरुन कुणालाही काहीएक सांगीतले नाही. दरम्यान शनिवारी (दि.२) रोजी विद्यालयात घेण्यात आलेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात तिने राज यास राखी बांधून मी तुझी बहीण आहे, तु यापुढे मला त्रास देवू नये अशी विनंती राजला केली.
त्यावेळी पिडीत मुलीने १२ वीत शिकत असलेल्या इतर एका मुलास राखी बांधत असताना राजने व्हिडिओ बनविला , फिर्यादी मुलीने तो व्हिडिओ डिलीट करण्याचे सांगितले असताना, त्याने व्हिडिओ डिलीट केला नाही. त्यामुळे मुलगी रडू लागली. पण व्हिडिओ डिलीट केलाच नाही. त्यानंतर पिडीत मुलगी दुकानातून पाणी घेवून ग्राउंडवरुन जात असताना राजने मुलीजवळ येवून तिला मारहाण केली. यावेळी तिने का मारत आहात असे विचारल्यावर पुन्हा त्याने तिच्या केसाला धरुन मारहाण केली.
मग मात्र सारीच सहनशक्ती संपल्याने संबंधित मुलीने कुटुंबियांच्या कानावर हा प्रकार घातला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात राज याच्यावर कलम 354, 354D, 323 बाल.लैं.अ. का.कलम 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जाधव करत आहेत.











