जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
खंडाळा : ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी खंडाळा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मच्छिबाजार परिसरात असणाऱ्या मोटार गॅरेजच्या एका जुन्या गाडीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने संपुर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार; खंडाळा या ठिकाणी मध्यवर्ती भागात एका गॅरेज आवारात बंद अवस्थेत अनेक गाड्या उभे आहेत. परिसरात दुर्गंधी आल्यामुळे गॅरेज चालकाने पाहिले असता त्याला सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला.
त्यानंतर खंडाळा पोलिसांना कळविण्यात आल्यावर खंडाळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदनानंतर शेजारीच असलेल्या खंडाळा दफनभूमीमध्ये दफन करण्यात आला. मिळालेल्या मृतदेहामुळे परिसरात आता प्रश्न उपस्थित होत आहेत ती व्यक्ती कोण? त्या ठिकाणी कशी गेली? याबाबत पुढील तपास खंडाळा पोलीस करत आहेत.











