राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : जालना जिल्ह्यातील अंरतवली सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले असतानाच दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी याचे तीव्र पडसाद पडल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केले होते. हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. या आंदोलनास ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला होता. आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालवत चालल्याने उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाने केली होती मात्र ते उपोषणावर ठाम होते.
याच वेळी पोलिसांनी आंदोलनात सहभागी असणाऱ्या तरुणांवर, स्त्रियांवर, लहान मुलांवर व तसेच वृद्धांवर कुठलीही दया व क्षमा न दाखवता अंधाधुंद लाठीचार्ज केला. सरकारच्या आदेशावरून लाठीचार्ज करुन हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. या लाठीचार्जनंतर याचे तीव्र पडसाद जालना जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी उमटत आहेत.
या घटनेचे तीव्र पडसाद दौंड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात ही उमटले आहेत. शनिवारी ( दि २) दौंड शहरात मराठा संघटनांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला, तर रविवारी ही याचे पडसाद पाटस, कानगाव, पारगाव, केडगाव ,पिंपळगाव, कडेठाण या गावांमध्ये उमटल्याचे चित्र पहायला मिळाले.
पाटसमध्ये संपूर्ण गावातील दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. कानगावमध्येही मराठा समाजाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत टायर जाळत या घटनेचा निषेध नोंदवला, तर पारगाव येथे निषेध मोर्चा काढून निषेध सभा घेऊन गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. केडगाव येथेही मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
पिंपळगाव व कडेठाण येथेही या घटनेचा निषेध करण्यात आला. विविध राजकीय पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, दौंड तालुक्यात जालना जिल्ह्यातील या घटनेचा शांततेत आंदोलन करण्यात आले. यवत व पाटस पोलिसांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.











