बारामती : महान्यूज लाईव्ह
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला आणि त्याचे पडसाद राज्यात उमटले. राज्यात कुठे जाळपोळ, तर कुठे आंदोलने, निषेध मोर्चे, रस्ता रोको सुरू झाले.. बारामती तालुक्यातील काटेवाडीतही हा रस्ता रोको झाला, पण या रास्ता रोकोमध्ये चक्क काटेवाडीकर पदाधिकाऱ्याने अजित दादांनाच विनंती केली की, आता एक तर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची साथ तरी सोडा!
आज सकाळी काटेवाडी येथे जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध म्हणून सकल मराठा समाज व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध म्हणून रास्ता रोको करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो जळकावत त्यांचा निषेध केला व राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी काटेवाडी सोसायटीचे माजी अध्यक्ष स्वप्निल काटे यांनी राज्य सरकारचा निषेध करताना अजित दादांना वरील विनंती केली, ते म्हणाले की, आम्ही हा निषेध करतोय त्यामध्ये अजितदादांचा फोटो नाही कारण राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच या घटनेला जबाबदार आहेत. आम्ही काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने अजितदादांना एकच विनंती करतो की, दादांनी आता एकतर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची साथ तरी सोडावी.
यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे म्हणाले, केवळ जालन्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला जाणार होता आणि त्यासाठी हे आंदोलन नको म्हणून ते आंदोलन दडपशाहीच्या मार्गाने दडपण्यासाठी सरकारने हे नीच कृत्य केले. आमचा पोलिसांवर रोष नाही, मात्र वरिष्ठांच्या आदेशाने हे कृत्य केले, असे सरळ सरळ पोलिस सांगत असतील, तर या घटनेला सर्वस्वी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदार आहेत. मागील सात वर्षांमध्ये मराठा समाजाने लाखोच्या संख्येने मोर्चे काढले, मात्र कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेच्या मार्गाने सुरू असणारे हे आंदोलन दडपण्याचा सरकारने प्रयत्न का केला?











