ज्ञानेश्वर रायते : महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या एका चौकात मागील एका वर्षापूर्वी चहाचे दुकान सुरू झाले.. आठ महिन्यापूर्वी भेळ आणि वडापाव चे एक दुकान सुरू झाले.. हा व्यवसायही जरा चांगला सुरू झाला आणि व्यवसाय सुरू करणारा दुकानदार किंवा तो व्यावसायिक तरुण काही दिवसातच इस्त्रीचे कडक कपडे घालून दुकानावर बसू लागला.. आता तर चित्र आणखीच बदललंय ..! हो.. खरंच बदललंय.. आता त्याच्या दुकानात पैसे घेण्यासाठी आणि ऑर्डर देण्यासाठी सुद्धा हिंदीतच बोलावं लागतं.. कारण त्याचं अख्खं दुकान परप्रांतीय कामगारांच्या ताब्यात आहे आणि हा बहाद्दर गावगन्ना हिंडतोय..!
अर्थात हे चित्र फक्त बारामतीतच नाही, राज्याच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी तुम्ही पाहिलं, तर तुमच्या प्रत्येकाच्या भागात हे तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येकाला शेठ व्हायचं आहे. प्रत्येकाला झपाट्याने श्रीमंत व्हायचे आहे, पण कष्टाची कामे नको आहेत! म्हणूनच कर्ज काढून दुकान सुरू केलं, तरीसुद्धा यांना सगळी कामे स्वतः करू वाटत नाहीत. त्यांना कामगारच लागताहेत.
कामगार कामावर ठेवण्याला काही दुमत नाही, परंतु बारामती सारख्या शहरांमध्ये अत्यंत वेगाने वाढणारी परप्रांतीय मजुरांची संख्या पाहिली, तर हे चित्र येत्या काही कालावधीत बारामतीला देखील मराठी माणसांपेक्षा परप्रांतीय, हिंदी बोलणाऱ्यांची संख्या अधिक असणारे शहर अशी ओळख देऊ शकेल की काय? अशी भिती आहे.
गेल्या काही वर्षात तरुण मुलं उद्योजक किंवा व्यावसायिक होण्याच्या अशाने वेगवेगळे व्यवसाय सुरू करताहेत. नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा.. हा जो सल्ला आहे, तो या मुलांनी अगदी तंतोतंत मनावर घेतलेला दिसतो. परंतु गेल्या काही महिन्यात आणखी एक चित्र दिसतंय की, हा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या व्यवसायातील साऱ्या गोष्टी करण्याला मात्र ते कचरत आहेत. त्यामुळेच दुकान तर सुरू होते, पण सगळी कामे परप्रांतीयांच्या ताब्यात जाताहेत.
चहाचे दुकान टाकायचे.. त्यासाठी लाखो रुपये देऊन फ्रॅंचायसी घेतली जाते, पण पाण्याने कप विसळायला मात्र लाज वाटते, असे असेल तर दुकान टाकतात कशाला? खूप मोठा धंदा आहे, प्रचंड मोठे गिऱ्हाईक आहे, अशावेळी ठीक आहे, परंतु जिथे ग्राहकांची संख्या मर्यादित आहे, अशा ठिकाणीही हे तरुण युवक कुठल्या भ्रमात वागत आहेत तेच कळायला मार्ग नाही.
याचाच गैरफायदा परप्रांतीय मजूर घेत आहेत. अगदीच उदाहरण सांगायचे झाले, तर बारामती शहरातील एमआयडीसी चौक परिसरात चक्क हार्डवेअरचे दुकान बिहारमधून आलेल्या मजुरांनी सुरू केले आहे. हे मजूर दुकानदार झाले, कारण त्यांनी प्रचंड कष्ट केले, हाही अर्थ त्याबरोबर घेतलाच पाहिजे. परंतु आपली दुकाने त्यांच्यावर विसंबून मोकळे फिरणारे मराठी तरुण पाहिले तर त्यांची किव वाटायला हवी, अशीच परिस्थिती आहे.
त्यामुळे दुकानाचा मालक मराठी तरुण आणि प्रत्यक्षात दुकानावरचा गल्ला मात्र परप्रांतीय मजुरांच्या ताब्यात.. असेच चित्र अनेक ठिकाणी सध्या दिसू लागले आहे. फक्त चहा, स्वीट होम किंवा भेळ, वडापाव ची दुकानेच नाहीत, तर दुचाकी नीट करण्याच्या गॅरेजपासून ते कापड दुकानापर्यंत परप्रांतीय मजुरांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे. पुण्या मुंबईसारखी मोठी शहरे पादाक्रांत केल्यानंतर परप्रांतीय मजूर आता गावागावातही आपला बिछाना अंथरू लागले आहेत.
दुर्दैव हे की अजूनही वेळ गेलेली नाही. मराठी तरुणांनो जागे व्हा. तुमची दुकाने स्वतः काम न करता दुसऱ्यांच्या ताब्यात देण्याइतकी मोठी झालेली नाहीत हे वास्तव लक्षात घेऊन आत्मपरीक्षण करा. तुम्ही स्वतःला इतके मोठे ही समजू नका, नाहीतर तुमचा हा आळशीपणा तुम्हाला पुन्हा रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही.
सध्या अनेक दुकानात मालिक बाहर गये है असे वाक्य ऐकायला आले की, तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही. खायच्या पदार्थांची युपी – बिहारी स्टाईल नावे पाहिली, की आपण नेमकं कोणाच्या दुकानात आलोय असा प्रश्न पडावा इतपत परिस्थिती आहे. आणि हे मजूर स्वच्छताही पाळत नाहीत, त्यामुळे एखाद्या मराठी तरुण नवीन व्यवसायिक झाल्यानंतर आपण आशेने त्याच्याकडे जावं, तर तिथे निराशा पदरात पडल्याशिवाय राहत नाही.
हे चित्र बदलले पाहिजे. कोणत्यातरी मोठ्या व्यवसायिकाकडे पाहून यांच्यातील व्यवसाय करण्याची उर्मी वाढलेली असते आणि त्यातूनच कर्ज काढून, किंवा आई-वडिलांकडून पैसे घेऊन हे मराठी तरुण बारामतीच, नाही राज्यभरातल्या विविध शहरांमध्ये अगदी गावखेड्यांमध्ये नव्याने व्यवसाय थाटत आहेत.
अशांना जागेवर आणण्यासाठी जिथे जिथे हे युवक स्वतः काम करत नाहीत आणि परप्रांतीय मजुरावर अवलंबून आहेत, अशा ठिकाणी खरेदी करताना स्वतः मराठी ग्राहकांनीच हात आखडता घेतला, ते मनोमन ठरवलं तर मराठी तरुणांची सध्याची अवस्था बदलू शकते.











