इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूरच्या जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली, त्या संधीच्या माध्यमातून आपण रात्रंदिवस मेहनत घेतली. इंदापूरच्या विकासासाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी, कोणत्या विभागातून कसा निधी आणायचा, याबाबत आपण आता माहिर झालो आहोत, या इंदापूरच्या पॅटर्नची फक्त जिल्ह्यात नाही, आता महाराष्ट्रात चर्चा होतेय असं वक्तव्य आमदार दत्तात्रेय भरणे यांनी केले आहे.
इंदापूर तालुक्यातील निरवांगी आणि घोरपडवाडी येथे सुमारे 3 कोटी 32 लाख रूपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन व लोकार्पण आमदार भरणे यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष विरसिंह रणसिंग, युवक तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, गजानन लंबाते, सरपंच राजेंद्र चांगण, अजिनाथ कांबळे, राजू कवितके, डॉ गोरे, विठ्ठल पवार, महेश रासकर, पिंटू निगडे, रणजित रासकर, समिर पोळ, अंकुश जाधव, बापू माने, अशोक जाधव, मनोज जाधव, शिवाजी जाधव, शशिकांत माने, उमेश जाधव, अक्षय देवकर, कैलास जाधव आदी उपस्थित होते.
भरणे म्हणाले की,आमदार म्हणून काम करताना आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य घटक तसेच गोरगरिबांच्या भल्यासाठी व गावोगावच्या विकासासाठी झाला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून आपण जनकल्याणाचे प्रश्न मार्गी लावत असतो. शेवटी काम करत असताना जनतेविषयी मनामध्ये तळमळ असल्यामुळेच माझ्या तालुक्यासाठी जास्तीत – जास्त निधी आणण्याची ताकद मिळते.
यावेळी निरवांगी (जाधववस्ती) येथील महिला व नागरिकांनी काळूबाई मंदिरासाठी सभामंडप, जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांच्या दुरूस्तीची मागणी आमदार भरणे यांच्याकडे केली असता, त्यांनी या मागणीची दखल घेत काळुबाई सभामंडपसाठी ५ लाख, शाळेच्या दुरूस्तीसाठी १० लाख, तसेच जाधववस्ती रस्त्यासाठी वाढीव १० लाख रुपये निधी मंजूर करण्याचे जाहीर केले. यावेळी घोरपडवाडी ते हगारेवाडी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.











