बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाला आज अचानक दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी भेट दिली. जय पवार यांची भेट अनौपचारिक व अचानक असली, तरी दोन दिवसांपूर्वीच झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात राबलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे जय पवार यांनी सांगितले.
दरम्यान जय पवार यांच्याशी कार्यकर्त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारतानाच राजकारणात सक्रिय होण्याबाबत संवाद साधला. जय पवार यांनी देखील तुम्ही दादांशी बोलून घ्या, त्यांचा सिग्नल आला की मी तयार आहे असे सांगत राजकारणात नव्याने सक्रिय होण्याचे संकेत देखील दिले त्यांचे हे संकेत राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांचा हुरूप वाढवणारे असल्याचे मानले जात आहे.
बारामतीतील शारदा प्रांगणच्या आवारातच असलेल्या राष्ट्रवादी शहर कार्यालयास अचानक जय पवारांनी भेट दिली. दोन दिवसापूर्वीच याच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी सत्कार सोहळा झाला. या ठिकाणी जंगी सभा देखील झाली. तसेच शहरातील मिरवणूकही जंगी स्वरूपाची झाली होती. जय पवार यांच्या या अनौपचारिक भेटीला ही पार्श्वभूमी होती. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, राष्ट्रवादीचे नेते सचिन सातव यांच्यासह माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी जय पवार यांच्या स्वागताला उपस्थित होते.
यावेळी महिला कार्यकर्त्यांनी जय पवार यांचे औक्षण करत शहर कार्यालयात त्यांचे स्वागत केले. यावेळी मी तुमच्या सगळ्यांचे कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे असे जय पवार म्हणाले. या अचानक भेटीदरम्यान अजितदादांनी सिग्नल दिला की आपण तयार असल्याचे सांगितल्याने जय पवार हे राजकारणात सक्रिय होणार हे मात्र नक्की झाल्याचे दिसून येत आहे.











