विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती :
उपमुख्यमंत्री अजित पवार नागरी सत्काराच्या वेळी म्हणाले की, माळेगाव सहकारी साखर कारखान्याला ३३५० पेक्षा जास्त भाव मिळेल. त्याच्यामुळे काही काळजी करू नका. अन् उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. यावेळी व्यासपीठावर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप व छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी जेजुरी येथे “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमात अजित पवार यांनी तालुक्यातील एक सहकारी साखर कारखाना मागील गाळप हंगामात गाळप झालेल्या उसास प्रति टन ३३५० रुपये ऊस दर देऊ शकेल असे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसानंतर लगेचच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडत ३३५० रुपये प्रति टन हा उच्चांकी ऊस दर जाहीर केला.
या अगोदर माळेगाव सहकारी साखर कारखान्याने मागील गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाच्या एफ आर पी पोटी २ हजार ८५१ दिले आहेत.तर कांडेबिलापोटी प्रति टन १०० रुपये दिले आहेत, असे एकूण आज पर्यंत ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना प्रति टन २ हजार ९५१ रुपये मिळाले आहेत.
पण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत जी दबक्या आवाजामध्ये ऊस दराबाबत चर्चा चाललेली होती, की माळेगावला सोमेश्वर एवढा भाव मिळेल की नाही? पण मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा जेवढा भाव मिळाला आहे. त्याच्यापेक्षा एक रुपया का होईना जास्त भाव माळेगाव सहकारी साखर कारखाना देऊन दाखवेल. एवढीच खात्री देतो.असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती कारखान्याबाबत तशी स्थिती नाही, पण अजित पवारांचाही छत्रपती सहकारी साखर कारखान्याला ऊस जातोय. छत्रपती सहकारी साखर कारखान्याला बाहेर काढण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. सगळेजण आम्ही त्या ठिकाणी कष्ट घेतोय. लवकरच त्याच्यामध्ये यश मिळेल.











