भाजपचे बाबामहाराज खारतोडे यांनी राष्ट्रवादीच्या हनुमंत कोकाटे यांच्यावर जहरी टीका..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यात गेल्या 9 वर्षात एकही संस्था काढली नाही किंवा तसा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही, एवढेच नव्हे तर तालुक्यातील एकाही शिकलेल्या युवकाला नोकरी लावली नाही.. तालुक्यात विकास केला म्हणायचं,पण तालुक्यात हा विकास नाही तर फक्त आकड्यांचा फुगा आहे, अशी जळजळीत टीका इंदापूर तालुका भाजपचे प्रवक्ते ह भ प बाबासाहेब महाराज खारतोडे यांनी राष्ट्रवादीवर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या वर टीकेची झोड उगवत अगोदर संस्था काढा, मगच बोला, असे खडेबोल खारतोडे यांनी सुनावले.
कचरवाडी (नि.के.) येथील सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी सहकारी संस्थांवर टीका केली होती.
त्या संदर्भात बोलताना ह भ प बाबासाहेब महाराज खारतोडे यांनी छत्रपती कारखान्यावरही विरोधकांनी बोलावे, असा सल्ला दिला. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली शेतकरी, कामगार यांच्या हितासाठी आम्ही बांधील आहोत. राज्यात हर्षवर्धन पाटील सत्तेवर असतानाच्या 20 वर्षाच्या काळात इंदापूर तालुक्याचा सर्वच क्षेत्राचा म्हणजे सहकार, शेतीसाठी पाणी, लोणी देवकर एमआयडीसी, वीज उपकेंद्रे, नद्यांवरील असंख्य बंधारे, गावोगावचे रस्ते, शिक्षण, प्रशासकीय इमारती, ट्रामा केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आदीच्या माध्यमातून तालुक्याच्या विविध क्षेत्राचा सर्वांगीण असा विकास झाला आहे.
त्यामुळेच आज इंदापूर तालुक्याची झालेली प्रगती दिसत आहे. या प्रगतीचे श्रेय हर्षवर्धन पाटील यांना आहे. याउलट विरोधकांनी गेल्या 9 वर्षात शिकलेल्या युवकांना नोकरी देण्यासाठी काहीही काम केलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील युवकांच्या हाताला कोण काम देणार? असा सवाल उपस्थित करीत, सध्याचा विरोधकांचा विकास हा नुसता आकड्यांचा फुगा आहे, असा टोलाही बाबासाहेब महाराज खारतोडे यांनी लगावला.











