विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर होते. त्यामुळे अजित पवार यांचे बारामतीकरांनी केलेल्या स्वागताची चर्चा सर्वत्र झाली. खुल्या जीपमधून अजित पवार यांची मिरवणूक काढण्यात आली.
अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अजित पवार बारामती दौऱ्यावर होते.
अजित पवार बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. अजित पवार यांचे यावेळी ढोल- ताशांच्या गजरात, जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं.
त्यानंतर बँड, ढोलपथकाच्या निनादात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. व्यापारी वर्गानेही अजित पवार यांचे स्वागत केले. तालुक्याच्या विविध ग्रामीण भागांतून तरुण दुचाकी रॅली काढून बारामतीच्या शारदा प्रांगण या ठिकाणी आले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांचे हार घालून स्वागत केले. अजितदादांच्या स्वागतासाठी एक कार्यकर्ता तर थेट क्रेनलाच लटकला होता. काही ठिकाणी तर क्रेनद्वारे ही हार घालण्यात आले. बारामतीकरांनी केलेल्या स्वागताने अजित पवारही भारावून गेले होते.











