जालना – महान्यूज लाईव्ह
जालना जिल्ह्यातील अंबड पोलिस ठाण्यातील फौजदाराला एका तक्रार अर्जाच्या चौकशीत मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
योगेश हरी चव्हाण असे या फौजदाराचे नाव आहे. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका जणाने साडेपाच एकर जमीनीचा व्यवहार केला. या व्यवहारादरम्यान जमीन देणार व घेणार या दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये ज्याने जमीन घेतली, त्याच्याविरोधात जमीनीच्या मालकाने पोलिस ठाण्यात कारवाईसाठी अर्ज केला.
या प्रकरणात तक्रार विरोधात आहे, मात्र चौकशीत मदत करतो असे सांगत अंबडच्या या फौजदाराने जमीन खरेदी केलेल्यास लाच मागितली. मध्यस्थामार्फत या जमीन खरेदी करणाऱ्याने फौजदाराला १० हजार रुपये दिले. मात्र फौजदाराने आणखी ४० हजारांची लाच मागितली.
फौजदाराची भूक वाढत चालल्याने जमीन खरेदी करणाऱ्याने थेट संभााजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. व तक्रार केली. तेथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता चन्हाण याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
मग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून चव्हाण याला रंगेहाथ पकडले. त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुल फुला, शिरीष वाघ, राजेंद्र सिनकर, चांगदेव बागुल यांच्या पथकाने केली.