सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
भावकी उण्याची वाटेकरी असते असं म्हणतात, इंदापूर तालुक्यातील कळंब येथे याचा प्रत्यय जाधव कुटुंबाला आला असून, चुलत भावानेच भावाचा कोयत्याने वार करून मृतदेह विहिरीत फेकून खून केल्याची घटना आज उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कळंब येथील हनुमंत सर्जेराव जाधव यांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला, पोलिसांनी संशयित आरोपी दत्तात्रय हरिदास जाधव याला ताब्यात घेतले असून त्याला अटकही केली आहे. यासंदर्भात पोलीस सूत्रांनी अधिक माहिती दिली.
आज सकाळी हनुमंत सर्जेराव जाधव हे त्यांच्या शेतातील वीज पंप सुरू करण्यासाठी निघाले असताना जनावरांना चारा टाकण्यासाठी थांबलेल्या दत्तात्रय हरदास जाधव याने पूर्व वैमनस्त्याचा राग मनात धरून शेजारी ठेवलेला कोयता उचलला आणि थेट हनुमंत जाधव यांना यांच्यावर कोयत्याने वार केले.
अचानक झालेल्या या हल्ल्यात हनुमंत जाधव हे स्वतःला वाचू शकले नाहीत, त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दत्तात्रय हरिदास जाधव याने हा मृतदेह शेजारच्या पाणी नसलेल्या विहिरीत टाकून दिला आणि त्यानंतर दत्तात्रय जाधव याने तिथून पलायन केले. मात्र ही घटना काही जणांच्या लक्षात आली आणि त्यांनी तातडीने पोलिसांना तसेच ग्रामस्थांना माहिती दिली.
त्यानंतर वालचंदनगर पोलीस त्या ठिकाणी तातडीने पोहोचले व आरोपीचा शोध घेतल्यानंतर शेजारच्या उसात दत्तात्रय जाधव हा आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी दत्तात्रय जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पुढील तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्री साळुंखे करीत आहेत.