किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
ही यशोगाथा आहे, इंदापूर तालुक्यातील बेलवाडीची.. साडेतीन एकरात घेतलेल्या केळी उत्पादनाची.. एका वर्षात या केळीचं उत्पादन निघालं..आतापर्यंत ७० टन केळी निघाली.. अजून निघतेच आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती इराणला पोहोचतेय आणि तिचा दर आहे.. बांधावरचा मोजून घेतलेला.. 22 रुपये प्रति किलो!
इंदापूर तालुक्यातील बेलवाडीचे हे शेतकरी आहेत गजानन कदम..! ते भवानीनगरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्यात वाहन इन्चार्ज म्हणून काम करतात, मात्र त्यांचं शेतीवरही तेवढेच प्रेम आहे. ते गेली एक नव्हे, दोन नव्हे, 22 वर्ष केळीचे उत्पादन घेतात.
कोरोनाच्या काळात त्यांना त्यांचीच उत्पादित केलेली केळी फक्त तीन रुपये दराने विकावी लागली. प्रचंड नुकसान झालं. मात्र ते खचले नाहीत, त्यांनी पुन्हा धीर धरला आणि केळी करायची मात्र सोडली नाही. एकूणच त्यांची केळी म्हणजे आता पारंपारिक पीक बनले आहे.
मागील वर्षी साडेतीन एकर क्षेत्रामध्ये त्यांनी केळीची भूमिपुत्र जातीची लागवड केली आणि त्याला भरघोस खतमात्रा देत त्याची वाढ जोमाने होईल, याकडे लक्ष दिलं. आता मागील आठवड्यापासून ही केळी काढणीला आली आहे. आतापर्यंत 70 टन केळी निघाली आहे आणि ती सर्व केळी इराणला निर्यात झाली आहे. निर्यातदाराने बांधावरच या केळीचा दर ठरवला, तो होता 22 रुपये प्रति किलो सरसकट दर.!
गजानन कदम म्हणाले, या बावीस वर्षात आम्ही कधीही केळीचे पीक करायचं सोडलं नाही. अनेकदा चढउतार आले. कोरोनाच्या काळात तर अगदी तीन ते चार रुपये प्रति किलो दररोज मिळाला. खूप मोठे नुकसान झाले. केळीला खर्च मोठा असतो. उत्पादनही आणि उत्पन्नही मोठे निघेल अशी आशा आणि अपेक्षा असते, परंतु बऱ्याचदा एक वर्ष पिकाचे उत्पादन मिळते, दुसऱ्या वर्षी ते मिळत नाही. असं आमच्याही बाबतीत बऱ्याचदा झालं आहे, परंतु आतापर्यंतच्या काळातील हा आमचा सर्वाधिक मिळालेला दर आहे.