बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरात एकाच दिवसात 16 घरफोड्या झाल्यानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले. इकडे सातव चौकातील चोरी पकडलेली असतानाच दुसरीकडे आज सकाळच्या वेळी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफडी करून चोरटे पळून जात असतानाच थरारक पाठलाग करून पोलिसांनी पकडले. सुमारे दहा किलोमीटर हा पाठलाग करत पोलिसांनी चोरट्यांना पकडल्यामुळे नागरिकांनी देखील पोलिसांचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चोरटे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील आहेत.
बारामतीतील घरफोड्यांनी पोलीस ॲक्शन मोड मध्ये आल्यानंतर आज पोलिसांनी नितीन दत्तात्रय जाधव (वय 36 वर्ष) व गोपीनाथ उर्फ सोनाजी नारायण अलगुडे (वय 27 वर्ष दोघेही रा. गेवराई जिल्हा बीड) या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. बारामती शहरात गेल्या दोन-तीन दिवसापासून घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पोलिसांपुढेही एक मोठ्या आव्हान निर्माण झाले होते,
परंतु इकडे शहर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले तर दुसरीकडे तालुका पोलिसांनी देखील बीड जिल्ह्यातील या दोघांना ताब्यात घेतल्यामुळे नागरिकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. घडलेली घटना अशी होती, सकाळी पावणेदहाच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील आदर्शनगर येथे घरफोडीची घटना घडली. मात्र घरफोडी करून पळून जात असताना आरोपींचे जाताना व येतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली.
नाकाबंदीवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे हे फुटेज पोचले आणि त्यानंतर आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळलेली दुचाकी ज्या रंगाची होती, त्या दुचाकीचा शोध सुरू झाला आणि अचानक दोघेजण संशयास्पद स्थितीत पळून जात असताना भिगवण रस्त्यावरून आढळले. त्यानंतर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अनिकेत काळे समाधान चोरमले, पोलीस अंमलदार राम कानगुडे शशिकांत दळवी, अमोल नरूटे, संतोष मखरे, दत्तात्रय मदने आदींच्या पथकाने या चोरट्यांचा पाठलाग सुरू केला.
हे चोरटे पळून जात असतानाच तब्बल दहा किलोमीटर त्यांचा पाठलाग करून भिगवण रस्त्यावरून जैनकवाडी फाट्याजवळ पोलीस पोचले, तेव्हा कोणत्याही स्थितीत आपण पकडले जाऊ या भीतीने चोरट्यांनी रस्त्याच्या कडेलाच असलेल्या उसामध्ये धूम ठोकली. चोरटे उसामध्ये शिरलेले असतानाच, चोरट्यांनी पळून जाऊ नये म्हणून उसाच्या शेताला वेढा घालण्यात आला. त्याचवेळी ग्रामस्थांची ही मदत घेण्यात आली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी स्वतः तिथे थांबून आणखी पोलीस कर्मचारी या ठिकाणी बोलावले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व त्यांचे पथकही या ठिकाणी पोचले आणि गावकऱ्यांची ही मदत करत या दोघांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार राम कानगुडे, दत्ता मदने, शशिकांत दळवी, संतोष मखरे यांच्यासह बारामती तालुका पोलीस ठाण्यातील व भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व स्थानिक गावकऱ्यांनी केली.