बारामती : महान्यूज लाईव्ह
चायनीज मांजा जप्त करून, कारवाई करूनही चायनीज मांजा मात्र रस्त्यावर दिसतोच आहे, अनेक लोकांच्या गळ्याला नख लावतोच आहे. इंदापूर मध्ये एका महिलेच्या कानाला आणि गळ्याला गंभीर जखम केल्याची घटना ताजी असतानाच, आज बारामती तालुक्यातील बांदलवाडी येथे काटेवाडीतील दुचाकीचालकाचा गळा चायनीज मांजाने कापला गेला.
सुदैवाने जखम फार खोल नसल्याने त्यांचा जीव बचावला मात्र त्याच वेळी दवाखान्यात अशा तीन घटना घेऊन रुग्ण आले होते. त्यामुळे चायनीज मांजावरची पोलिसांची कारवाई अजून कठोर व सखोल होण्याची गरज आहे
आज दुपारच्या वेळी काटेवाडीतील कुंडलिक मारुती कोळी हे 40 वर्षीय गृहस्थ त्यांच्या दुचाकीवरून दत्तात्रय चांदणे यांच्यासह निघाले होते. त्याचवेळी रस्त्यावर चायनीज मांजा तुटून पडला होता आणि तो रस्त्याला थेट आडवा पडला होता. तो लक्षात न आल्याने कोळी यांची दुचाकी पुढे गेली आणि हा मांजा त्यांच्या गळ्याभोवती अडकला गेला आणि गाडीच्या वेगाने हा मांजा त्यांच्या गळ्याला कापून गेला.
त्यानंतर तातडीने चांदणे यांनी गाडी थांबवून कोळी यांच्या गळ्याभोवतीचा मांजा काढला व त्यांना तातडीने बारामतीत नेले. त्यावेळी त्यांचा रक्तस्त्राव खूप होत होता. दरम्यान काही दवाखान्यांमध्ये डॉक्टर उपस्थित नसल्याने त्यांनी धावाधाव करून चार ते पाच दवाखान्यांमध्ये गेले व त्यामधील एका खाजगी दवाखान्यात त्यांना दाखल करून घेण्यात आले.
डॉक्टरांनी तातडीने त्यावर उपचार केले. सुदैवाने खूप खोलवर जखम गेली नव्हती त्यामुळे तुमचा जीव बचावल्याचे डॉक्टरांनी सांगितले, त्यानंतर कोळी यांनी अक्षरशः देवाचे आणि डॉक्टरांचे आभार मानले. दरम्यान याचवेळी आणखी एक जण चायनीज मांजामुळे जखमी होऊन दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाला होता अशी माहिती दत्तात्रय चांदणे यांनी दिली. एकूणच चायनीज मांजाने पतंग उडवण्यात येणाऱ्या आनंदापेक्षा एखाद्या कुटुंबावर आघात करत असल्याने सणाचा आनंद नेमका कसा घ्यावा यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे