सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पतंग उडवण्यासाठी इंदापूर भागात चायनीज मांजाचा मोठया प्रमाणावर होणा-या वापरामुळे लहान मुलांसह नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. चायनीज मांजा कापून अनेक नागरिक, बालके जखमी होण्याची प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने मांजा विक्रेत्यांवर कारवाई न करता आंधळ्याची भूमिका घेतली असल्याचे दिसत आहे. जीवघेण्या मांजा विक्री करणारांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांची आहे.
तीन दिवसांवर पंचमी येऊन ठेपली आहे. मात्र मांजाचा धोका असताना तसेच त्यावर बंदी असताना शहरातील व्यापाऱ्यांनी चायनीज मांजा या धोकेदायक दो-याची विक्री केली असल्याचे चित्र दिसत आहे. 14 ऑगस्ट रोजी इंदापूर शहरातील जुनी कचेरी येथून स्कुटीवरून प्रवास करताना शहरातील एका महिलेचा रस्त्यावर लोंबकळणा-या चायनीज मांजाने गळा आणि कान कापला. तर गळ्याला 17 टाके पडले असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सुज्ञ नागरिकांनी समोर आणली.
गेल्या वर्षी पंचमीत ३ ऑगस्ट रोजी इंदापूर शहरातील टेंभूर्णी नाक्यावर चायनीज मांजा हनुवटीवर कापल्याने पाऊणे तीन वर्षाचा विराट उत्तम शिंदे (रा. स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) हा चिमुकला गंभीर जखमी झाला होता. तर संतोष भोई (रा. माळवाडी नं. २) या दुचाकीस्वाराचा अकलूज रोडवरील कचरा डेपोनजीक गळा कापता कापता राहिला होता.
नशीबाची साथ मिळाल्याने हे दोघेही वाचले. यावर्षीही अनेक जणांना मांजा कापल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे संबंधित प्रशासन, व्यापारी आणि नागरिकांनी चायनीज मांजा आणि नायलॉन दोरा वेळीच कापायची तसदी घ्यायला हवी, अन्यथा पुढचा नंबर कोणाचा असेल हे सांगता येत नाही.वरील दोन्ही घटनानंतर काही विक्रेत्यांवर कारवाई झाली खरी. परंतु आता अजून एखादी घटना होण्याआधी संबंधित प्रशासन कारवाई करेल का असा सवाल उपस्थित होत आहे.
चायनीज मांजावर कारवाई संदर्भात पर्यावरण विभागाचा आदेश आहे. तर महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम (१३५) (१) नुसार गुन्हा नोंदवण्याची, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ प्रमाणे कारवाई करण्याची तरतूदही आहे. वास्तविक पाहता पुन्हा एखाद्याचा गळा कापण्याआधी संबंधित प्रशासनाने आदेश काढून काढून जनजागृती करायला हवी. शहरात मांजा विक्रेते अल्प प्रमाणात आहेत. त्या व्यापाऱ्यांनीही नैतिकता, जबाबदारी समजून घेत विक्री करू नये.. परंतु घातक मांजा, नायलॉन दोरा शहरातून हद्दपार करण्यासाठी आता संघटना किंवा नागरिकांनी समोर यायला हवं. पालकांनीही थोडंसं मुलांवर लक्ष देणे गरजेचे आहे. दहा पतंग कापून गेले तरी चालेल, कुणाचा गळा कापला जाऊ नये असे जनसामान्यांचे मत आहे.