राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडीनंतरचे परिणाम खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौड तालुक्यातील गावभेट दौऱ्यात जाणवले. खासदार सुप्रिया सुळे या ५२ दिवसांनंतर पहिल्यांदाच दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गाव दौऱ्यावर होत्या. शनिवारी (दि १९) त्यांनी दौंड तालुक्यातील पूर्व भागातील ८ गावांचा गावभेट दौरा केला.
अर्थात यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी जेव्हा जेव्हा दौंड तालुक्याचा दौरा केला, तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, कात्रज दूध संघाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे, दौंड शुगरचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य जगदाळे यांच्यासह माजी आमदार रमेश थोरात गटाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी असायचे, मात्र माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या शनिवारी झालेल्या दौऱ्याकडे त्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मात्र तरीही खासदार सुप्रिया सुळे यांच्या या दौऱ्याला तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्रही पाहायला मिळाले. खडकी येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत व वाजतगाजत त्यांचे व या तालुक्याच्या दौऱ्याचे जंगी स्वागत केले. गावभेटीच्या नियोजित असलेल्या गावांमध्ये खासदार सुळे यांचे फाटाक्यांची आतिषबाजी करत आणि वाजतगाजत जंगी स्वागत करत आम्ही तुमच्या सोबत असल्याचे एकप्रकारे स्पष्ट संकेत दिले.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांना शिवसैनिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान केले होते. त्यानुसार दौंड तालुक्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व काँग्रेसचे पदाधिकारी खासदार सुळे यांच्या या दौऱ्यात सहभागी झाले होते.
शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दौंड राष्ट्रवादीची गटबाजीतील पोकळी या दौऱ्यात भरून काढल्याचे चित्रही पहायला मिळाले. दरम्यान, मागील दोन लोकसभा निवडणुकीत दौंड तालुक्यात मतदानात पिछाडीवर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत दौंड तालुक्यात कसा प्रतिसाद मिळतो हे पहावे लागणार आहे.