सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर शहरातील दलित वस्ती भागातील विकास कामे निकृष्ट? त्या कामाच्या चौकशीच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते शिवाजीराव मखरे यांचे इंदापूर नगरपरिषदेसमोर स्वातंत्र्यदिनी अर्धनग्न आंदोलन..!
आमदार दत्तात्रय भरणे व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रयत्नातून दलित सुधार योजनेमधून इंदापूर शहरातील आंबेडकरनगर, साठेनगर, लोकमान्यनगर व होलारनगर भागात २ कोटी ७७ लाख रुपयाची विकासकामे करण्यात आली.
ती कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत असा आरोप करत सदर कामांची त्रयस्थ एजन्सी मार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी मखरे यांनी केली होती.
सदर कामाच्या चौकशीसाठी शासन दरबारी मागणी करुन ही कोणतीही चौकशी न झाल्याने अखेर शिवाजीराव मखरे यांनी इंदापूर नगरपरिषदेसमोर स्वातंत्रदिनी अर्धनग्न आंदोलन केले..या आंदोलनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या कामाच्या दर्जा कसा असेल याचीच इंदापूर शहरात चर्चा सुरू आहे..