महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष विचाराने एकत्र आलो आहोत. मी जे सांगतोय तेच माझं मत आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जर अशा घटना घडत असतील तर दुर्दैवी आहे- शरद पवार
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे.राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात भेट झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, आमच्यात संभ्रम निर्माण करू नका. महाविकास आघाडीतील आम्ही तिन्ही पक्ष विचाराने एकत्र आलो आहोत. भाजपशी संबंधित जे आहेत, त्या घटकांशी आमचा कोणत्याही प्रकारे सहभाग नाही, ही भूमिका स्पष्ट झाल्यावर संभ्रम राहिलेला नाही. एकदा एक गोष्ट स्पष्ट केल्यावर तुम्ही पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करू नका. मी जे सांगतोय तेच माझं मत आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
यावेळी ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या बाबतीत बोलताना शरद पवार म्हणाले.हे चिंताजनक आहे.घडलं कुठं ठाण्यात.मुख्यमंत्री ठाण्यातून येतात.मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जर अशा घटना घडत असतील तर दुर्देवी आहे.राज्य कोणत्या दिशेने जात आहे हे दिसून येत आहे.जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे.ठाण्यात मृत्यूचं तांडव झालं.हे चित्र दुरुस्त करण्यासाठी सरकारने कठोर आणि तातडीचे पाऊल उचललं पाहिजे.असं मत शरद पवार यांनी व्यक्त केल आहे.