विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : तालुक्यातील पाहुणेवाडी येथील उसाच्या पिकाला वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. शेतातून गेलेल्या वीजतारांमध्ये मोठ्या प्रमाणावर झोळ पडल्याने हवेमुळे या तारा एकमेकांना खेटत असतात. त्याचा परिणाम मात्र शेतकऱ्याला भोगावा लागला.
पाहुणेवाडी येथील शेतकरी पोपट तावरे व शिवाजी तावरे यांच्या मालकीचा हा ऊस आहे. या शेतकऱ्यांनी मागील वर्षी ८६०३२ या उसाची लागण केली होती. वर्षभर काबाडकष्ट करत उसाला जगवण्यासाठी त्यांनी रात्र-रात्र पिकाला पाणी दिले होते. अशात काही महिन्यांतच ऊसही तोडणीला आला असता, मात्र १० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी तीन वाजता शॉर्टसर्किट झाल्यामुळे उसाने पेट घेतला.
यामध्ये पूर्ण एक एकर ऊस जळाला. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या दोन्ही शेतकऱ्यांनी केली आहे. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अनेक ठिकाणी हाताशी आलेली पिके जळाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाता- तोंडाशी आलेला घास हिरावून जात आहे.