बारामती : महान्यूज लाईव्ह
फक्त दिड एकर जमीन.. या दीड एकर जमिनीच्या बळावर पशुपालन शेळी पालन यशस्वीरीत्या करणारे बारामती तालुक्यातील काटेवाडी नजिकच्या ढेकळवाडीतील शेतकरी अशोक सुदाम घुले यांना सपत्नीक यंदाच्या स्वतंत्र दिन सोहळ्यातील कार्यक्रमाला विशेष आमंत्रित म्हणून प्रधानमंत्री कार्यालयाने निमंत्रित केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा व्यवस्थित लाभ घेऊन शेतकरी कुटुंबाचा उत्कर्ष झाला अशा शेतकरी कुटुंबांना प्राथमिक दृष्ट्या निवडून त्यांना यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यातील विशेष आमंत्रित म्हणून निमंत्रित करण्याची योजना केंद्र सरकारने आखली होती. याअंतर्गत प्रधानमंत्री कार्यालयाने निवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये बारामती तालुक्यातील ढेकळवाडी येथील अशोक घुले यांची निवड झाली आणि घुले यांचा आनंद गगनात मावेना.
लाल किल्ल्यावरील स्वातंत्र दिनाच्या सोहळ्यामध्ये होत असलेला संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी घुले दाम्पत्याला विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त जे ध्वजारोहण होते, त्यासाठी देशभरातून आमंत्रित करण्यात आलेल्या 1800 व्यक्तींमध्ये केंद्र सरकारकडून ज्या योजना राबवल्या गेल्या, त्यांचा व्यवस्थित लाभ घेतलेल्या 250 लाभार्थ्यांचा समावेश आहे.
यामध्ये अशोक घुले व त्यांच्या पत्नी मंगला अशोक घुले यांचा समावेश करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या या पाहुण्यांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक पंतप्रधान संग्रहालय तसेच दिल्लीतील विविध सरकारपर्यंत ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
घुले यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा व्यवस्थित लाभ घेतला त्यांचा एकही हप्ता चुकलेला नाही. या योजनेतून बारामती ताुक्यातील 52 हजार 800 लाभार्थी नियमित लाभ घेत आहेत. आत्तापर्यंत 14 हफ्त्यापोटी साधारण 145 कोटी रक्कमेचा लाभ तालुक्यात देण्यात आलेला आहे