युवराज जाधव, महान्यूज लाईव्ह
बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील, कागल तालुक्यातील! या बातमीने मात्र सध्या घराघरात जे संस्काराची विण कमी होताना दिसत आहे, घरातील सदस्यांबाबतच सोशल मीडिया आणि वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे प्रेमाची विण कमी होत आहे, तिला उजाळा देणारी आणि ही माणुसकीची मायेची वीण घट्ट करणारी ही घटना आहे कागल तालुक्यातील उंदरवाडी गावातील पाटील कुटुंबातील!
मुलाने आईला तिच्या इच्छा विचारून घेतल्या आणि निधनापूर्वीच एक वर्षांपूर्वी आधी तिच्यासाठी पालखी बनवून घेतली. तिच्या निधनानंतरही अंत्ययात्रा पालखीतूनच काढली. कोल्हापूर जिल्ह्यातील या घटनेने सर्वत्र या आईवर अत्यंत प्रेम व्यक्त करणाया मुलाचं कौतुक होत आहे.
कागल तालुक्यातील उंदरवाडी या गावातील मारुती पाटील यांनी आपल्या आईची अंत्ययात्रा पालखीतून काढली आणि साहजिकच राज्यभर त्याची चर्चा झाली. घटना शोककळेतली असली, दुःखाची असली तरी देखील या घटनेने अनेकांच्या मनावर समाधानाची फुंकर मारली.
मारुती पाटील यांचं आपल्या आईवर अत्यंत प्रेम होते, कारण आई भगीरथी शिवाजी पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोलमजुरी करून मुलगा मारुती यांना शिकवले, वाढवले. आज पाटील कुटुंबाचे गावावर वर्चस्व आहे. भगीरथी यांच्या सून अनिता याच गावच्या सरपंच आहेत.
काही दिवसांपूर्वीच भगीरथी पाटील यांचा पाद्यपूजन कार्यक्रम थाटामाटात साजरा करण्यात आला होता. एक वर्षापूर्वीच मारुती पाटील यांनी आईची अंत्ययात्रा पालखीतून काढणार असल्याचे ठरवले. एका वर्षापूर्वीच पालखी देखील तयार करण्यात आली होती आणि बुधवारी वयाच्या 87 व्या वर्षी भगिर्थी पाटील यांचे निधन झाले आणि मारुती पाटील यांनी त्यांची अंत्ययात्रा पालखीतून काढली.