मोडनिंब : महान्यूज लाईव्ह
शेतकऱ्याला आपली जमीन प्राणाहून प्रिय असते. पंचवीस वर्षापूर्वी गरजेपोटी हातातून गेलेल्या जमिनीची सल त्या शेतकऱ्याच्या मनात सगळ्या आयुष्यभर राहिली. मृत्यूच्या वेळी त्यांनी ही सल आपल्या जावयाला, जो त्यांचा भाचाही होता, त्याला सांगितली. आता आपल्या मामा किंवा सासऱ्याच्या मृत्यूनंतर ही जमीन मिळविण्यासाठी हा भाचा आता आटोकाट प्रयत्न करतो आहे.
माढा तालुक्यातील मोडनिंबची ही कथा. या कथेतील व्हिलन केवळ परिस्थिती नाही तर सरकारी महसूल यंत्रणाही आहे. तलाठ्यापासून अगदी उपमुख्यमंत्र्यांपर्यत सर्वांच्या दारात जावून, त्यांची पत्रे आणूनही माढ्याचे तहसीलदार न्याय देत नसल्याने अखेर या भाच्याने म्हणजे दादासाहेब दत्तात्रय पवार यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. जमीनीचा व्यवहार करतेवेळी दादासाहेबांची आई मृत्यू पावली होती. त्यामुळे तिचे हक्क सोड झालेले नव्हते. त्यामुळे तिचे नाव उताऱ्यावर वारस म्हणून राहिले. ही बाब दादासाहेबांना त्यांच्या मामांनी सांगितली होती. ज्यावेळी त्यांना ही गोष्ट कळली त्यावेळी त्यांनी कायदेशीर पुर्तता करून इतर हक्कात वारस म्हणून त्यांची आणि त्यांचा एक भाऊ आणि बहिण यांची नोंद करून घेतली.
आता त्यांची मागणी सदरची जमीन त्यांच्या नावावर करून देण्याची आहे. त्यांची ही मागणी सर्व नियमात बसत असूनही मोडनिंबचे तलाठी तसेच तहसीलदार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. २०१९ पासून दादासाहेब या मागणीचा पाठपुरावा करत आहेत. शासनाच्या नियमानूसार वारसा हक्काच्या नोंदी दत्परी लावणे बंधनकारक असूनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. पवार यांनी यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विभागीय महसूल आयुक्त, जमाबंदी आयुक्त, जिल्हाधिकारी सोलापूर, उपविभागीय अधिकारी माढा, तहसीलदार माढा यांना अनेकवेळा लेखी निवेदने देऊनही प्रशासनाने आजपर्यंत त्यांच्या या मागणीची दखल घेतलेली नाही.
त्यांच्या या हक्काच्या जमिनीच्या खरेदी विक्रीचे बेकायदेशीर व्यवहार करण्यास महसूल विभागाने तत्परता दाखवली पण आता सर्व नियमात असूनही दादासाहेबांची जमीन त्यांच्या नावावर करण्यास मात्र हाच विभाग टाळाटाळ करत आहेत. वारंवार तक्रार करूनही तहसीलदार राजेश चव्हाण आणि राहुल शिंदे, मंडल अधिकारी विशाल गायकवाड व संबंधित तलाठी यांनी काही प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दादासाहेबांनी केली आहे. दादासाहेबांनी पाठविलेल्या कोणत्याही पत्राचे उत्तर आतापर्यंत माढ्याच्या तहसील कार्यालयाने दिलेले नाही. त्यामुळे आता दादासाहेबांनी आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे. आतातरी प्रशासनाच्या त्यांची दखल घ्यावी असे मागणी नागरिक करीत आहेत.











