बारामती : महान्यूज लाईव्ह
बातमी बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची! कारखान्याने एका पाठोपाठ एक विक्रम करत आता 2022 -23 च्या हंगामातील उसाचा दर जाहीर केला आहे. तो पाहून अनेक कारखान्यांना आता विचार करावा लागेल, कारण सोमेश्वर कारखान्याने 22- 23 च्या संपलेल्या गळीत हंगामासाठी प्रति मेट्रिक टन 3350 रुपयांचा ऊस दर जाहीर करून राज्यात आघाडी घेतली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील या कारखान्याने राज्यात पहिल्या नंबरचा हा दर दिला असल्याची माहिती सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली आहे. सोमेश्वर साखर कारखान्याने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ऊसदरामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस ऊसाचा साखर उतारा असलेला कारखाना म्हणूनही सोमेश्वर कारखाना गणला जातो. एकेकाळी काहीशा अडचणीत असलेल्या साखर कारखान्याने एवढी भरारी घेतली आहे की, राज्यातील कारखान्याचे आणि ऊस उत्पादकांचे देखील डोळे दिपले आहेत.
या संदर्भात जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार 2022-23 च्या गळीत हंगामात कारखान्याने 12 लाख 56 हजार 768 टन उसाचे गाळप केले. या कारखान्याचा सरासरी साखर उतारा 11.92% राहिला आणि या कारखान्याने या संपूर्ण गळीत हंगामात 14 लाख 67 हजार 950 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले.
कारखान्याकडे सहवीजनिर्मिती प्रकल्प देखील असून या प्रकल्पातून या संपलेल्या गाळपंगांमध्ये आठ कोटी 92 लाख 51 हजार 779 युनिटची वीज निर्मिती या कारखान्याने केली असून, या कारखान्याने यापैकी 5 कोटी 71 हजार युनिट ची वीज विक्री केली. कारखान्याच्या आसवनी (डिस्टीलरी) प्रकल्पातून देखील 91 लाख 7 हजार लिटर अल्कोहोलचे उत्पादन झाले असून, 41 लाख 95 हजार 984 लिटर इथेनॉल उत्पादन घेतले आहे.
या कारखान्याची 2022-23 हंगामाची एफ आर पी 2850 रुपये प्रतिटन येत होती, मात्र आतापर्यंत कारखान्याने या एफआरपीच्या बदल्यात सभासदांना प्रति मेट्रिक टन उसामागे 2900 रुपयांची रक्कम सभासद खात्यावर वर्ग केली होती. आता उरलेली 450 प्रतिटनी रक्कम दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.
या कारखान्याने सभासद, बिगर सभासद असा कोणताही भेदभाव केला नसल्याचे सांगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्यात नेत्रदीपक प्रगती केली असल्याचे जगताप यांनी सांगितले. या कारखान्याच्या कामकाजात प्रशासनिक दृष्ट्या देशाचे नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांचे नेहमीच मार्गदर्शन असते असेही जगताप यांनी म्हटले आहे.