सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
बऱ्याचदा असं होतं की आपण शोधायला जातो, एक आणि सापडतं दुसरंच! इंदापूर पोलिसांच्या बाबतीत असंच काहीसं झालं, जेव्हा अल्पवयीन पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या पोलिसांमुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चोरीला जात असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेळ्या मेंढ्या चोरणारे चोर सापडले.
इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावडा, निमगाव, सरडेवाडी या भागात गेल्या काही महिन्यात सातत्याने शेळ्या व मेंढ्या चोरण्याचे प्रकार घडत होते. त्यावरून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी या संदर्भात बावडा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के.बी. शिंदे, हवालदार गायकवाड, श्री कदम, श्री कळसाईत, श्री हेगडे, अकबर शेख, गणेश ढेरे, नंदू जाधव, विनोद लोखंडे, आरिफ सय्यद, विक्रम जमादार यांच्या पथकास सूचना दिली होती.
त्यानुसार केलेल्या तपासात पोलिसांनी मेजर उर्फ सोमनाथ सिताराम मोरे, पॉयझन उर्फ प्रथमेश भोसले (दोघेही रा. रेडा ता. इंदापूर) निलेश बाबासाहेब सर्वदे (राहणार काही, ता. इंदापूर) आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांनी या गुन्ह्यांची कबुली दिली आणि 53 हजार 500 रुपयांचा चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला
दरम्यान पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यात शेळ्या मेंढ्या चोरीला जाण्याचे अनेक गुन्हे घडले आहेत. यामध्ये 75 ते 80 शाळा चोरीला गेल्याचा अंदाज आहे. या चोरांच्या मागावर इंदापूर पोलीस होते. त्या दृष्टीने ते तपासाची व्युहरचना आखत होते. इंदापूर पोलिसांनी यातील संशयितांपर्यंत पोहोचताच आणखी एक गोष्ट घडली.
सोलापूर जिल्ह्यातील पोलीस एका अल्पवयीन अपहृत मुलीच्या तपासासाठी बावडा पोलिसांकडे आले. त्यांच्या तपासाच्या दरम्यान बावडा पोलिसांनी संशयित म्हणून ज्यांच्याकडे नजर ठेवली होती, त्यातील एक जण या प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय आला आणि पोलिसांनी त्याला शोधण्यास सुरुवात केली. हा संशयित सापडताच त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर शेळ्या मेंढ्या चोरण्याच्या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलांसह तीन जण सहभागी असल्याचे आढळून आले. त्यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि सतरा गुन्हे उघड झाले.