इंदापूर नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला..! संध्याकाळी घडलेल्या हल्ल्याच्या घटनेने इंदापूरात खळबळ ..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : किरकोळ कारणावरून इंदापूर नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ठेकेदारावर व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.हा हल्ल्याचा प्रकार आज (दि.८)रोजी सावतामाळीनगर मधील बावडा वेस नाक्याजवळ सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला.हल्ल्याच्या घटनेमुळे इंदापूर शहरात खळबळ उडाली आहे.
या घडलेल्या प्रकाराची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्याचे काम सुरु होते. कोयत्याने झालेल्या हल्ल्यात नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ठेकेदार सुधीर किसन पारेकर (वय ३० वर्षे, रा. पारेकर वस्ती, वनगळी,ता.इंदापूर), राजेश हरीदास शिंदे ( वय ५४ वर्षे,रा. सावतामाळीनगर,इंदापूर) हे दोघेजण जखमी झाले आहेत.
पारेकर यांच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली आहे. तर शिंदे यांच्या दंडावर व हातावर जखम झाली आहे.पारेकर यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान या घटनेविषयी पारेकर यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पारेकर हे नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ठेकेदार म्हणून काम करतात.
ते बावडा वेस नाक्यालगतच्या भागात डास निर्मुलनासाठी धुरळणीचे काम करुन घेत होते.यावेळी आरोपीने त्यांच्याकडे जावून धुरळणी यंत्र मागितले. यंत्र गरम झाल्याने ते देण्यास पारेकर यांनी नकार दिल्याने आरोपीने चिडून त्यांच्या कपाळावर कोयत्याने वार केला. त्या नंतर त्याच भागातील माजी नगरसेवक राजेश शिंदे यांनी यापूर्वी आपल्या वडीलांना शिवीगाळ केली होती असे म्हणत त्याचा राग धरुन आरोपीने, त्यांच्या हातावर व दंडावर कोयत्याने वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी गेले असता पोलिसांबरोबर देखील त्याची शाब्दिक चकमक झाल्याचे समजते.