नगर : महान्यूज लाईव्ह
शहरातील टिळक रस्त्यावर टेम्पो चालकाला अडवून तीस हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेऊन फरार झालेल्या दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी २ दिवसात जेरबंद केले. कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन्ही आरोपींना सापळा लावून नगर-सोलापुर रोडवरील कोंबडीवाला मळा येथून अटक केली असून दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गणेश गुलाब बडदे (वय २५ वर्षे, राहणार इंगळेमळा सारसनगर, अहमदनगर) सुमेध किशोर साळवे (वय २५ वर्षे गौतमनगर, बालिकाश्रम रोड अहमदनगर) अशी दोघा आरोपींची नावे आहे. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की,स्वप्नील रावसाहेब गंगावणे (वय १८ वर्षे, रा कवडाणे ता.कर्जत जि. अहमदनगर) हे गुरुवारी रात्री एक वाजता टिळक रोडवरील पटेल मंगल कार्यालय समोरुन त्यांचा टेम्पो घेऊन जात होते.
आरोपींनी त्यांना अडवले. मारहाण करून गाडी फोडून तीस हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली होती. कोतवाली पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली होती की, या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी नगर-सोलापूर रस्त्यावर एका ठिकाणी थांबलेले आहेत. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी दोघांना सापळा लावून ताब्यात घेतले.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे करीत आहेत. पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक निरीक्षक रविंद्र पिंगळे, हवालदार तन्वीर शेख, योगेश भिंगारदिवे, इस्त्राईल पठाण, सलीम शेख, अभय कदम, अतुल काजळे, सागर मिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.