विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
जेजुरी : अखेर पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे होणाऱ्या “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाला मुहूर्त लागला आहे. ७ ऑगस्ट रोजी जेजुरी येथे होणार “शासन आपल्या दारी” कार्यक्रम होणार आहे. नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ देण्यासाठी सोमवार ७ ऑगस्ट रोजी जेजुरी येथे “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. याअगोदर चारवेळा येथील “शासन आपल्या दारी” कार्यक्रम रद्द झाला होता. अनेक लाभार्थ्यांना लाभाची वाट पहावी लागली. कार्यक्रमासाठी जेजुरीच्या पालखी मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला होता . यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली होती. सुमारे एक महिना शासकीय यंत्रणा राबत होती. मात्र कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने भव्य मंडप काढण्यात आला होता.
७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी दालने उभारण्यात येणार आहेत. त्यासोबतच महिला बचत गटानी तयार केलेल्या उत्पादनांचे देखील दालन असणार आहे.पुणे जिल्ह्यातील उत्पादनाची माहिती देणारे ‘मेक इन पुणे’ प्रदर्शन आणि आरोग्य शिबिराचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि उपचार करण्यात येतील. त्यासाठी वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे नागरिकांची निवेदने स्वीकारण्याची सुविधाही येथे असणार आहे.याच ठिकाणी रोजगार मेळाव्याचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. “शासन आपल्या दारी” योजनेच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेने गावपातळीवरील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचाही प्रयत्न केला आहे.